जी. एच. रायसोनी महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टीचा जल्लोष; भावी अभियंत्यांचा उत्साह शिगेला!
डीजे, मनोरंजक खेळ आणि विविध स्पर्धांनी रंगली पार्टी; संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांचे गुणवत्ता, कौशल्यविकास आणि आत्मविश्वास वाढविण्याचे आवाहन
जळगाव, ता. १९ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज
ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात प्रवेश
घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘फ्रेशर्स पार्टी’
उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. महाविद्यालयीन जीवनाची नवी सुरुवात करणाऱ्या
विद्यार्थ्यांना स्नेहपूर्ण वातावरणात एकत्र आणणे, वरिष्ठ
विद्यार्थ्यांशी त्यांची ओळख वाढविणे, मैत्रीचे नवे
बंध निर्माण करणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास व सांघिक भावना विकसित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
संगीत, मनोरंजक खेळ, विविध स्पर्धा आणि विद्यार्थ्यांच्या
कलागुणांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार झाला.
कार्यक्रमाच्या
प्रमुख सत्रात जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती
अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयीन जीवनाकडे केवळ
पदवी मिळविण्याचा टप्पा म्हणून न पाहता स्वतःचे ज्ञान, कौशल्ये, व्यक्तिमत्त्व आणि भविष्यातील करिअर
घडविण्याची महत्त्वपूर्ण संधी म्हणून पाहण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, आजच्या वेगाने बदलणाऱ्या
तंत्रज्ञानाच्या युगात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमापुरते
मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नवकल्पना आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक
ज्ञान आत्मसात करण्यावर भर द्यावा. उद्योगक्षेत्रातील बदलती आव्हाने समजून घेत
संवादकौशल्य, नेतृत्वगुण, सांघिक कार्य आणि समस्या सोडविण्याची
क्षमता विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या
शैक्षणिक आणि सहशैक्षणिक संधींचा पुरेपूर लाभ घेत विद्यार्थ्यांनी स्वतःची वेगळी
ओळख निर्माण करावी. यशस्वी करिअर घडविण्यासाठी मेहनतीसोबत सातत्य, शिस्त, सकारात्मक
दृष्टिकोन आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही
विशेष गुणवत्ता असते; त्या गुणांना
योग्य दिशा देऊन त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होताना
जिंकण्याइतकेच सहभागातून शिकणे, अपयशातून धडा
घेणे आणि इतरांच्या यशाचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे. फ्रेशर्स पार्टीसारखे उपक्रम
विद्यार्थ्यांमधील संकोच दूर करून त्यांच्यात मैत्री, सहकार्य आणि संस्थेबद्दल आपलेपणाची
भावना निर्माण करतात. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी
नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी
करावा, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी
व्यासपीठावर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, मेकॅनिकल
विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील तसेच प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा.
जितेंद्र वढदकर उपस्थित होते.
फ्रेशर्स
पार्टीदरम्यान विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर घालण्यासाठी विविध मनोरंजक खेळ, डीजे संगीत आणि सहभागात्मक उपक्रमांचे
आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग
नोंदवत आपल्या कलागुणांचे, व्यक्तिमत्त्वाचे
आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले. अभ्यासासोबतच सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक
उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याने नवागत विद्यार्थ्यांचा आनंद
द्विगुणित झाला. या कार्यक्रमामुळे विविध अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांना
एकमेकांशी संवाद साधण्याची, नव्या मैत्रीची
सुरुवात करण्याची आणि महाविद्यालयीन वातावरणाशी सहज जुळवून घेण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमातील
विशेष आकर्षण ठरलेल्या ‘मिस्टर फ्रेशर’, ‘मिस फ्रेशर’
तसेच विविध विशेष पुरस्कारांच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग
घेतला. व्यक्तिमत्त्व, सादरीकरण, वेशभूषा आणि रॅम्प वॉक अशा विविध
गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या स्पर्धांचे परीक्षण प्रा. वसिम
पटेल व प्रा. सुवर्णा सराफ यांनी केले.
या स्पर्धेत
मिस्टर फ्रेशर हा किताब आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विभागाच्या साद
बागवान याने, तर मिस फ्रेशर हा किताब
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC)
विभागाच्या
रितू राठोड हिने पटकावला. तसेच बेस्ट आउटफिट हा पुरस्कार कॉम्प्युटर सायन्स अँड
इंजिनिअरिंग (CSE) विभागाच्या गौरी वर्मा हिने, बेस्ट स्माइल हा पुरस्कार आर्टिफिशियल
इंटेलिजन्स विभागाच्या मयूर चेडे याने, तर बेस्ट वॉक
हा पुरस्कार कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या साक्षी वाणी हिने
मिळविला. विजेत्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या फ्रेशर्स पार्टीने विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन जीवनाला आनंददायी सुरुवात करून दिली. विविध शाखांतील विद्यार्थ्यांमध्ये मैत्री, सहकार्य आणि संस्थेबद्दल आपलेपणाची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. या कार्यक्रमाचे समन्वय अभियांत्रिकी विभागातील प्रा. सुवर्णा सराफ आणि प्रा. अक्षय पाटील यांनी उत्तमरीत्या पार पाडले. या यशस्वी आयोजनाबद्दल रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.



Comments
Post a Comment