जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ‘इंटर्न-ट्रॅक हॅकेथॉन’मध्ये ४५ संघांची कल्पकता पणाला; नाविन्यपूर्ण डिजिटल उपायांची निर्मिती

तंत्रज्ञानाधारित उपायांना मिळाली दाद; गोदावरीच्या ‘अल्गोनेक्स’ संघाने पटकावला प्रथम क्रमांक, तर अन्य विजेत्या संघांचीही चमकदार कामगिरी

जळगाव, दि. २२ : विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप प्रक्रियेला अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध, तंत्रज्ञानाधारित आणि उद्योगाभिमुख करण्याच्या उद्देशाने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘जीएचआर इंटर्न-ट्रॅक हॅकेथॉन’ मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेची आणि तांत्रिक कौशल्याची प्रभावी झलक दाखविली.बिल्डिंग स्मार्टर इंटर्नशिप इकोसिस्टिम्स – इनोव्हेट • व्हॅलिडेट • एलेव्हेट’ या संकल्पनेवर आधारित या हॅकेथॉनमध्ये तब्बल ४५ संघांनी सहभाग नोंदवत इंटर्नशिप व्यवस्थापनातील विविध आव्हानांवर नाविन्यपूर्ण डिजिटल उपाय सादर केले. स्पर्धेतील उत्कृष्ट प्रकल्पांचे परीक्षण तज्ञ परीक्षकांनी केले असून, अंतिम निकालात गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगावच्या ‘अल्गोनेक्स’ संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील संगणकशास्त्र विभागाचे प्रा. मनीष जोशी उपस्थित होते. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. डॉ. स्वाती पाटील, प्रा. कल्याणी नेवे, डॉ. चेतन चौधरी, डॉ. दीपक नेमाडे, प्राध्यापक, परीक्षक, विद्यार्थी व मार्गदर्शक उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील इंटर्नशिप ही अत्यंत महत्त्वाची असून ती विद्यार्थ्यांनी पूर्ण गांभीर्याने, एकाग्रतेने आणि प्रामाणिकपणे पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. इंटर्नशिपच्या काळात विद्यार्थी उद्योगातील शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, उपस्थिती आणि त्यांना सोपविण्यात आलेले काम किती प्रामाणिकपणे पूर्ण करतात, याचे प्रभावी निरीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी इंडस्ट्री मेंटर आणि फॅकल्टी मेंटर यांच्यात रिअल-टाइम संवाद निर्माण करणारी प्रभावी डिजिटल प्रणाली विकसित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या हॅकेथॉनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या प्रणालीमध्ये विद्यार्थी, फॅकल्टी मेंटर्स आणि इंडस्ट्री मेंटर्स यांना एका युनिफाइड डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोडणे, उपस्थिती, विविध माइलस्टोन्स आणि परफॉर्मन्स यांचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करणे, व्हेरिफाइड डेटाच्या आधारे ट्रान्सपरंट इव्हॅल्युएशन आणि कंटिन्युअस फीडबॅक देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या कामगिरीतील व कौशल्यांतील उणिवा डेटा-ड्रिव्हन इनसाइट्सच्या माध्यमातून ओळखणे अपेक्षित होते. या प्रणालीमुळे इंडस्ट्री-अकॅडमिया कोलॅबोरेशन अधिक मजबूत होऊन विद्यार्थ्यांची प्लेसमेंट रेडिनेस वाढविणे आणि यशस्वी इंटर्नशिपचे जॉब किंवा स्टार्टअप कन्व्हर्जनमध्ये रूपांतर करण्यास मदत करणे, हा या हॅकेथॉनचा प्रमुख उद्देश होता.

प्रा. डॉ. अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करताना उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी उत्तम कोडर्स असून त्यांच्यामध्ये मोठी तांत्रिक क्षमता आहे, असे सांगितले. या हॅकेथॉनमधून दिवसाअखेरीस सर्वांना अभिमान वाटेल अशी परिणामकारक प्रणाली विद्यार्थ्यांनी विकसित करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सहभागी सर्व संघांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता आव्हानात्मक पद्धतीने वापरून नाविन्यपूर्ण उपाय साकारावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रमुख अतिथी प्रा. मनीष जोशी यांनी विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम, समर्पण, सातत्य आणि जबाबदारी यांचे महत्त्व पटवून देताना भक्त पुंडलिक आणि पांडुरंगाच्या कथेचा दाखला दिला. पुंडलिक आई-वडिलांच्या सेवेत तल्लीन असताना पांडुरंग स्वतः भेटण्यासाठी आले, तरी त्याने प्रथम आई-वडिलांची सेवा पूर्ण करण्याला प्राधान्य दिले. याच उदाहरणातून विद्यार्थ्यांनीही इंटर्नशिपदरम्यान आपल्यावर सोपविण्यात आलेल्या कामाला आणि जबाबदारीला सर्वोच्च प्राधान्य देऊन ते प्रामाणिकपणे पूर्ण करावे, असा संदेश त्यांनी दिला.

इंटर्नशिपमध्ये केवळ विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती तपासण्यापेक्षा ते प्रत्यक्षात काय शिकत आहेत, त्यांना कोणत्या अडचणी येत आहेत, त्यांच्या आकांक्षा काय आहेत आणि त्यांना अधिक चांगल्या संधी मिळण्यासाठी संस्था व मार्गदर्शक आणखी कोणती मदत करू शकतात, यावर अधिक सकारात्मक व सक्रियपणे लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रा. जोशी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतःसमोर सातत्याने नवी आव्हाने ठेवून शरीर, मन आणि आत्मिक पातळीवर विकास साधावा तसेच एका ध्येयावर सातत्याने अधिकाधिक वेळ आणि एकाग्रतेने काम करण्याची क्षमता विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले.

हॅकेथॉनमध्ये सकाळी ८ वाजता रिपोर्टिंग झाल्यानंतर सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांवर काम केले. मर्यादित वेळेत प्रभावी आणि व्यवहार्य डिजिटल समाधान विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोडिंग, डिझाइन, डेटा विश्लेषण, समस्या निराकरण, टीमवर्क आणि सादरीकरण कौशल्यांचा प्रभावी वापर केला. संपूर्ण दिवसभर महाविद्यालय परिसरात तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण विचार आणि सर्जनशीलतेचे उत्साही वातावरण पाहायला मिळाले.

स्पर्धेतील प्रकल्पांचे परीक्षण श्रीमती श्रेया सामदानी, प्रा. महेश सदावर्ते, प्रा. स्वप्नील महाजन, श्री. सुरज जाधव, प्रा. हुतेश बाविस्कर आणि श्री. पंकज वानखेडे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांमधील नाविन्यता, तांत्रिक व्यवहार्यता, समस्येचे आकलन, उपायाची उपयुक्तता, सादरीकरण, टीमवर्क आणि भविष्यातील विस्ताराची क्षमता यांसारख्या बाबींचा विचार करून मूल्यांकन करण्यात आले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे आणि सादरीकरणाचे कौतुक करत हॅकेथॉनचे आयोजन अत्यंत उत्तम झाले असून विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्यांसोबतच प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन त्यावर व्यवहार्य उपाय शोधण्याची उत्कृष्ट संधी मिळाली, असा सकारात्मक अभिप्राय व्यक्त केला.

हॅकेथॉनच्या बक्षीस वितरण समारंभात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगावच्या ‘अल्गोनेक्स’ संघाने प्रथम क्रमांक मिळवत १५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. या संघात डिंकी शदानी, हर्षदा वारुळे, गौरव पाटील आणि प्रेम बोरसे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

द्वितीय क्रमांकाचा १० हजार रुपयांचा पुरस्कार जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगावच्या ‘इनोव्ह८’ संघाने मिळविला. या संघात भावेश योगराज पाटील, दामिनी धनंजय देशमुख, गिरीश भांडारकर आणि अनन्या विजय जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

तृतीय क्रमांकाचा ५ हजार रुपयांचा पुरस्कार आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूरच्या ‘माइंड मास्टर’ संघाने पटकावला. या संघात निरज निवृत्ती पाटील, चेतन रणजित गोसावी, दीक्षा धनराज दावकर आणि अनुराग तुषार वैष्णव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

याशिवाय उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोन संघांना प्रशंसा पुरस्कार देण्यात आले. चौथा क्रमांक मिळविणाऱ्या आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूरच्या ‘कोड क्राफ्टर’ संघाला प्रशंसा पुरस्कार-१ प्रदान करण्यात आला. या संघात तनुश्री भामरे, वैभवी नेरे, लीना मगर आणि कोमल देसले यांचा समावेश आहे. तसेच पाचवा क्रमांक मिळविणाऱ्या एसएसबीटी कॉलेज, जळगावच्या ‘अल्फा स्टॅक’ संघाला प्रशंसा पुरस्कार-२ देण्यात आला. या संघात पल्लवी पाटील, चेतन कोळी, सुजाता फुसे आणि हेमलता पाटील यांचा समावेश आहे.

बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान हॅकेथॉनचे परीक्षण करणाऱ्या सर्व तज्ञ परीक्षकांचा जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे परीक्षण करताना परीक्षकांनी दिलेल्या वेळेचे, मार्गदर्शनाचे आणि तज्ज्ञ अभिप्रायाचे त्यांनी कौतुक केले. परीक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे, नाविन्यपूर्ण संकल्पनांचे आणि सादरीकरणातील आत्मविश्वासाचे कौतुक करत स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडल्याचे सांगितले.

अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी हॅकेथॉनमध्ये सहभागी सर्व विद्यार्थी, परीक्षक, मार्गदर्शक, समन्वयक आणि आयोजनाशी संबंधित सर्वांचे आभार मानले. हॅकेथॉनसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन त्यावर तांत्रिक व व्यवहार्य उपाय शोधण्याची संधी मिळते. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, टीमवर्क, समस्या सोडविण्याची क्षमता, नवकल्पनाशक्ती आणि उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित होतात, असे त्यांनी नमूद केले.

या हॅकेथॉनच्या आयोजनात प्रा. डॉ. स्वाती पाटील, प्रा. कल्याणी नेवे, डॉ. चेतन चौधरी आणि डॉ. दीपक नेमाडे यांनी कन्व्हेनर म्हणून जबाबदारी सांभाळली. प्रा. आशिष के. पाटील आणि प्रा. जुनैद खान यांनी को-ऑर्डिनेटर म्हणून काम पाहिले, तर विद्यार्थी को-ऑर्डिनेटर धीरज अहिरराव, ओम मंडलिया, अथर्व चौरसिया आणि सत्यम बिर्ला यांनी आयोजनात महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

जीएचआर इंटर्न-ट्रॅक हॅकेथॉन’ हा विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप प्रक्रियेला अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि उद्योगाभिमुख बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरला. विद्यार्थ्यांच्या डिजिटल संकल्पनांमधून रिअल-टाइम मॉनिटरिंग, ट्रान्सपरंट इव्हॅल्युएशन आणि कंटिन्युअस फीडबॅकला अधिक प्रभावी स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि तांत्रिक कौशल्यांना दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे जी. एच. रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

नवे तंत्रज्ञान, नवी कौशल्ये आणि बदलते शिक्षण : प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, जळगाव