जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा
UGC निर्देशानुसार मातृभाषांच्या जपणुकीचा संकल्प : विद्यार्थ्यांनी मांडले भाषिक वैविध्य
जळगाव, ता. १२ : भारतीय भाषांचे संवर्धन आणि भाषिक ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना दरवर्षी ११ डिसेंबर
रोजी ‘भारतीय भाषा दिवस’ साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जी.
एच. रायसोनी महाविद्यालयात उत्साहात ‘भारतीय भाषा दिवस’ साजरा करण्यात आला.
या उपक्रमात अध्यक्षस्थानी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून जी.
एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे होते तर
व्यासपीठावर अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र
वढद्कर हे उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल
यांनी बहुभाषिक शिक्षणाचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासातील
महत्त्व स्पष्ट केले. महाविद्यालयात तीन भाषांचा अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना
क्रेडिट गुण मिळतात, याची माहिती देत त्यांनी तीन भाषांवरील प्रावीण्य आजच्या
शिक्षणप्रणालीत किती उपयुक्त आहे, यावर प्रकाश टाकला.
त्या म्हणाल्या की, नवीन
शिक्षणधोरणानुसार (NEP) बहुभाषिकता ही फक्त अभ्यासक्रमाचा भाग नसून ती
विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाची किल्ली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांचे ज्ञान विद्यार्थ्यांना
व्यापक विचारशक्ती, सांस्कृतिक जाण, संवादकौशल्य आणि
रोजगारक्षमता वाढवण्यासाठी मदत करते. एकापेक्षा अधिक भाषा शिकल्याने
विद्यार्थ्यांना मिळणारे अकॅडमिक क्रेडिट्स त्यांच्या एकूण गुणफळात थेट भर घालतात, हे त्यांनी स्पष्ट केले.
तीन भाषांचा अभ्यास केल्याने विद्यार्थी अधिक
आत्मविश्वासाने शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात पुढे जाऊ शकतात, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध भाषा अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा, नियमित सहभाग ठेवावा आणि क्रेडिट प्रणालीचा प्रभावी उपयोग करावा, असे आवाहन केले.
तसेच अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनीही भारतीय
भाषांची समृद्ध परंपरा, त्यांची सांस्कृतिक मुळे आणि राष्ट्रनिर्मितीतील महत्त्व
अधोरेखित केले. भारतीय भाषांमध्ये सामाजिक, ऐतिहासिक आणि
ज्ञानपर संपदा दडलेली असून त्या भाषांचे संवर्धन हे आजच्या पिढीचे कर्तव्य
असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध भारतीय भाषांमुळे देशाची ओळख अधिक व्यापक, सामर्थ्यवान आणि जगापुढे अनोखी ठरते, असे सांगत त्यांनी
विद्यार्थ्यांना आपल्या-आपल्या मातृभाषेत वाचन, लेखन व संवाद
वाढवण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयात विविध समाज व प्रांतातून आलेल्या
विद्यार्थ्यांनी आपल्या-आपल्या मातृभाषेत संवाद साधत भारतीय भाषांच्या समृद्ध
परंपरेचा अनोखा अनुभव सर्वांसमोर मांडला. हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, गुजराती, पंजाबी, कन्नड, मलयाळम आदी भाषांतील अभिव्यक्तींमुळे कार्यक्रमाला बहुरंगी
रूप मिळाले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, भारतीय भाषांची जपणूक आणि भाषिक सद्भावाचा संदेश यामुळे कार्यक्रम विशेष ठरला.
महाविद्यालयाच्या वतीने पुढील काळातही अशा सांस्कृतिक व भाषिक उपक्रमांचे आयोजन
करण्याचा संकल्प संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल याच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. अक्षय पाटील यांनी तर सूत्रसंचालन नेहा कुमारी यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक व्यक्त केले.

Comments
Post a Comment