जी. एच. रायसोनी महाविध्यालयात एआय, डिजिटल फॉरेन्सिक्स व सायबर सुरक्षेवरील सहा दिवसीय एफडीपीचे उद्घाटन

तज्ञांच्या मार्गदर्शनासह प्रात्यक्षिक प्रशिक्षण, संशोधन लेखांवरील चर्चा आणि औद्योगिक भेटीतून आधुनिक सायबर आव्हाने व त्यावरील उपाययोजनांचा घेतला जाणार सखोल आढावा.

जळगाव, ता. १२ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स विभागाच्या वतीने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अटल योजनेअंतर्गत ‘एआय फॉर डिजिटल फॉरेन्सिक्स अँड सायबर सिक्युरिटी : इमर्जिंग ट्रेंड्स अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स’ या विषयावरील सहा दिवसीय ऑफलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे (एफडीपी) सोमवारी (ता. १२) उत्साहात उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सचे सहाय्यक प्राध्यापक आणि सायबर सुरक्षा व डिजिटल फॉरेन्सिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ प्रा. डॉ. चरणसिंग एन. कायते उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल होत्या.

उद्घाटनपर मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. चरणसिंग कायते यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाचा प्रवास आणि डिजिटल फॉरेन्सिक्समधील त्याचा वाढता वापर स्पष्ट केला. जनरेटिव्ह एआयमुळे तंत्रज्ञानाचा वापर अधिक व्यापक झाला असला, तरी सायबर गुन्हेगारही नवनवीन तंत्रांचा वापर करत आहेत. त्यामुळे गुन्हे तपासाशी संबंधित तज्ज्ञांनी तंत्रज्ञानातील बदलांशी सातत्याने अद्ययावत राहून गुन्हेगारांच्या पुढे राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. या सहा दिवसांच्या प्रशिक्षणातून डिजिटल फॉरेन्सिक्सची कार्यपद्धती, प्रत्यक्ष साधनांचा वापर आणि सायबर सुरक्षेतील आधुनिक आव्हाने समजून घेण्याची संधी सहभागी प्राध्यापकांना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल फॉरेन्सिक्स आणि सायबर सुरक्षा ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील अत्यंत महत्त्वाची क्षेत्रे असल्याचे नमूद केले. आरोग्य, शेती, शिक्षण तसेच गुन्हे तपास आणि आर्थिक फसवणूक उघडकीस आणण्यापर्यंत एआयचा वापर वाढत आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानातील बदल समजून घेऊन त्याचा जबाबदारीने वापर करण्यासाठी प्राध्यापकांनीही अद्ययावत राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल फॉरेन्सिक्स आणि सायबर सुरक्षेतील संशोधन हे बहुविद्याशाखीय स्वरूपाचे असून, मूलभूत संशोधन आणि उपयोजित संशोधन या दोन्हींचे महत्त्व समान आहे. एआयच्या मदतीने सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक आणि डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते. मात्र, या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या नव्या आव्हानांचीही जाणीव असणे गरजेचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणनुसार बहुविद्याशाखीय शिक्षणाला महत्त्व असून, विद्यार्थ्यांना भविष्यातील तांत्रिक आव्हानांसाठी तयार करण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची भूमिका मोलाची आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी प्रा. डॉ. चरणसिंग कायते यांच्या संशोधनकार्याचा व डिजिटल फॉरेन्सिक्स क्षेत्रातील अनुभवाचा परिचय करून दिला. फॉरेन्सिक सायन्स संस्थेतील प्रयोगशाळांना दिलेल्या भेटीदरम्यान सायबर सुरक्षा, मोबाइल फॉरेन्सिक्स आणि फसवणूक तपासणीसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. एआयसीटीईच्या अटल उपक्रमातून प्राध्यापकांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात असून, रायसोनी संस्थेतही विविध विषयांवर सातत्याने प्रशिक्षण दिले जाते, असे त्यांनी नमूद केले.

या एफडीपीमध्ये डिजिटल फॉरेन्सिक्सची मूलतत्त्वे, सायबर सुरक्षा, एआयचा फॉरेन्सिक तपासातील वापर, मोबाइल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन, मशीन लर्निंग, मालवेअर विश्लेषण, सायबर धोक्यांची माहिती आणि इंट्रुजन डिटेक्शन यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांची सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण, प्रयोगशाळेतील उपक्रम आणि औद्योगिक भेटीचाही कार्यक्रमात समावेश आहे.

कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. करिष्मा चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले. सहसमन्वयक प्रा. कल्याणी नेवे यांनी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे प्राध्यापकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान मिळण्यास आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होईल, असे मनोगत व्यक्त केले.

पुढील पाच दिवसांत तज्ञांची मार्गदर्शक सत्रे, प्रात्यक्षिके आणि औद्योगिक भेट

या एफडीपीअंतर्गत १३ ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध तज्ज्ञांची मार्गदर्शक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. मंगळवारी (ता. १३) प्रा. डॉ. स्मिता चौधरी (असोसिएट प्रोफेसर, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे) या एआयच्या साहाय्याने गोपनीयता जपण्याच्या तंत्रांवर मार्गदर्शन करतील, तर श्री. मंगेश गुल्हाने (सॉफ्टवेअर डेव्हलपर, आयबेस इलेक्ट्रोसॉफ्ट एलएलपी) हे सायबर सुरक्षेतील एआयच्या वापराविषयी माहिती देतील.

बुधवारी (ता. १४) प्रा. डॉ. अर्जुन माने (असिस्टंट प्रोफेसर, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स) हे डिजिटल फॉरेन्सिक्समध्ये एआयचा वापर आणि मोबाइल फॉरेन्सिक तपासणी या विषयांवर मार्गदर्शन करतील. गुरुवारी (ता. १५) श्री. नकुल देशमुख (डायरेक्टर, आयबेस इलेक्ट्रोसॉफ्ट एलएलपी) हे सायबर सुरक्षेतील मशीन लर्निंग तंत्र आणि सायबर सुरक्षा व फॉरेन्सिक्ससाठी उपयुक्त प्रत्यक्ष साधनांच्या वापराविषयी मार्गदर्शन करतील.

शुक्रवारी (ता. १६) जळगाव जिल्हा सायबर सेल येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर श्री. आशुतोष म्हैस्कर (सायबरसिक्युरिटी, एसएचआय-लोकुझ येथील वरिष्ठ सल्लागार) हे सायबर सुरक्षेतील बदलते स्वरूप आणि थ्रेट इंटेलिजन्स या विषयावर मार्गदर्शन करतील. शनिवारी (ता. १७) डॉ. अमोल देशमुख (गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, मुंबई येथील सायबर सेल विभागप्रमुख) हे एआयच्या साहाय्याने मालवेअर विश्लेषण या विषयावर मार्गदर्शन करतील. याच दिवशी प्रश्नमंजुषा, चिंतनात्मक नोंदवही आणि समारोप समारंभ होणार आहे.

या सर्व सत्रांसोबत दररोज प्रात्यक्षिक प्रशिक्षण व प्रयोगशाळेतील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संशोधन लेखांवरील चर्चेच्या माध्यमातून डिजिटल फॉरेन्सिक्स, मालवेअर शोध, एआय-आधारित घुसखोरी शोध प्रणाली आणि स्मार्ट होम व आयओटी प्रणालींच्या सुरक्षेसंबंधी संशोधनाचा आढावा घेतला जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ‘इंटर्न-ट्रॅक हॅकेथॉन’मध्ये ४५ संघांची कल्पकता पणाला; नाविन्यपूर्ण डिजिटल उपायांची निर्मिती

नवे तंत्रज्ञान, नवी कौशल्ये आणि बदलते शिक्षण : प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, जळगाव