गणेश विसर्जनानंतर रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ‘स्वच्छता सेवा’; मेहरूण तलाव परिसरात निर्माल्य संकलन

विसर्जनानंतरची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्वीकारली; निर्माल्यापासून खत निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जळगाव, ता. २६ : गणेश विसर्जनाचा उत्साह संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मेहरूण तलाव परिसरात जमा झालेले निर्माल्य आणि कचरा पाहून त्याकडे दुर्लक्ष न करता जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली. सकाळच्या प्रहरात विद्यार्थ्यांनी मेहरूण तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवित मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलित केले. जळगाव शहर महानगरपालिका, रोटरेक्ट क्लब ऑफ रायसोनी जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना आणि इन्स्टिट्यूशन’स इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘उत्सवाबरोबरच पर्यावरणाचीही जबाबदारी’ असा सामाजिक संदेश देण्यात आला.

गणेश विसर्जनाच्या दिवशी विविध सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतींच्या विसर्जनामुळे तलाव परिसरात फुले, दुर्वा, हार, पूजेचे साहित्य आणि अन्य कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच रायसोनी महाविद्यालयाचे विद्यार्थी मेहरूण तलाव परिसरात पोहोचले. त्यांनी परिसराची स्वच्छता करत निर्माल्य आणि इतर कचरा वेगळा केला. संकलित केलेल्या निर्माल्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार असून, या खताचा वापर रोपवाटिकेसाठी केला जाणार आहे.

‘उत्सव संपला, जबाबदारी नाही’; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

गणेशोत्सवातील श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधण्याच्या उद्देशाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीशी संबंधित विविध उपक्रमांना महाविद्यालयात सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांनी केवळ वर्गातील शिक्षणापुरते मर्यादित न राहता समाज आणि पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी ओळखावी, यासाठी त्यांना अशा उपक्रमांद्वारे प्रत्यक्ष कृतीची संधी दिली जाते. याच विचारातून गणेश विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी मेहरूण तलाव परिसराची स्वच्छता करत मोठ्या प्रमाणात निर्माल्याचे संकलन केले.

पूजेसाठी वापरलेली फुले, दुर्वा, हार तसेच अन्य निर्माल्य पाण्यात विसर्जित केल्यामुळे जलस्रोतांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे निर्माल्याचे स्वतंत्र संकलन करून त्याचे योग्य पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करून त्याचा रोपवाटिकेसाठी पुनर्वापर केला जाणार आहे. ‘उत्सव संपला, जबाबदारी नाही’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत हा उपक्रम राबविला. ‘स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे,’ या विचारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून निर्माल्याचे कचऱ्यात रूपांतर न करता त्याचे उपयुक्त खतामध्ये रूपांतर करण्याचा ‘कचऱ्यातून संपत्ती’ आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापनाचा संदेश देण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या कृतीतून स्वच्छतेचा संदेश

या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी तलाव परिसरातील निर्माल्य संकलित करण्यासोबतच परिसरातील अन्य कचराही गोळा करून स्वच्छता केली. आयुष म्हस्के, मयंक ठाकूर, विवेक भंगाळे, संस्कृती लगड, ओम चौधरी, यश कोहले, यश पाटील, निहारिका पाटील, नुपूर भडाणे, हार्दि भोयर, सिद्धांत सुरवाडे, पूर्वेश तायडे, यश पाटील, अक्षय सैंदाणे, सत्यम पी. भंडारी, विवेक तायडे, गौरव पाटील, हर्षाली सपकाळे, देवाशिष चौधरी आणि सानिया लुल्ला यांनी या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

नागरिकांनी भविष्यात गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी द्यावे आणि जलस्रोतांमध्ये निर्माल्य अथवा पूजेचे साहित्य टाकू नये, असे आवाहनही विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे जी. एच. रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनिलजी रायसोनी यांनी कौतुक केले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. श्रिया कोगटा, प्रा. डॉ. विशाल राणा यांनी समन्वय साधले तर प्रा. प्रिया टेकवानी, प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. अमोल जोशी, प्रा. वसीम पटेल, व योगशिक्षक कृणाल महाजन यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ‘इंटर्न-ट्रॅक हॅकेथॉन’मध्ये ४५ संघांची कल्पकता पणाला; नाविन्यपूर्ण डिजिटल उपायांची निर्मिती

नवे तंत्रज्ञान, नवी कौशल्ये आणि बदलते शिक्षण : प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, जळगाव