जी.एच. रायसोनी महाविद्यालयात शिक्षक दिन सोहळा
*ज्ञान, नवोपक्रम आणि संस्कारांच्या शिल्पकारांना सलाम!,२३ प्राध्यापकांच्या योगदानाचा गौरव*
जळगाव,ता.०६ : ज्ञानदानातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करून सक्षम पिढी घडविणाऱ्या प्राध्यापकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, स्टुडंट काउन्सेलिंग, प्रवेश प्रक्रिया, एनपीटीईएल, स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, एंटरप्रेन्युअरशिप, सीएसआर, परीक्षा प्रशासन, ईआरपी इम्प्लिमेंटेशन, क्रीडा तसेच विद्यार्थी विकासाच्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २३ प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुहास गाजरे आणि अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरपर्सन श्रीमती निशा जैन उपस्थित होत्या. तसेच अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत आणि डीन (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) प्रा. डॉ. मुकुंद पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांच्या कार्याला नवी दिशा देणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी प्राध्यापकांची भूमिका केवळ वर्गखोलीतील ज्ञानदानापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक, मेंटर आणि आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून घडविण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एज्युकेशन आणि उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार प्राध्यापकांनी स्वतःचे ज्ञान व कौशल्ये सातत्याने अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्किल डेव्हलपमेंट, स्टुडंट काउन्सेलिंग, एंटरप्रेन्युअरशिप, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्राध्यापकांच्या ज्ञानातून विद्यार्थी घडतो आणि घडलेला विद्यार्थी पुढे समाज व राष्ट्राच्या विकासात योगदान देतो, ही शिक्षणाची व्यापक भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख पाहुणे डॉ. सुहास गाजरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्राध्यापकांनी अध्यापनाच्या पारंपरिक पद्धतींसोबतच विविध नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा प्रयोग करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केवळ एका प्राध्यापकाच्या ज्ञानावर अवलंबून न ठेवता विविध स्रोतांमधून ज्ञान मिळविण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा, जिज्ञासा आणि समस्या सोडविण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी त्यांच्यासमोर नवनवीन आव्हाने व संधी निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्रीमती निशा जैन यांनी आपल्या मनोगतातून प्राध्यापकांच्या समाजनिर्मितीतील योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “ज्याप्रमाणे एक माता आपल्या मुलांना घडविते, त्याचप्रमाणे एक शिक्षक संपूर्ण देशाला घडवितो. शिक्षक जसा विचार करतो, तसा समाज घडतो. त्यामुळे शिक्षकांचे समाजनिर्मितीतील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.”
यावेळी महाविद्यालयाच्या विविध विभागांमध्ये आणि विविध शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. डॉ. मुकुंद पाटील, प्रा. डॉ. स्वाती पाटील, प्रा. रफिक शेख, प्रा. डॉ. सौरभ नाईक, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. तन्मय भाले, प्रा. अमोल जोशी, प्रा. वसीम पटेल, प्रा. श्रिया कोगटा, श्री. अतुल महाजन, रजिस्टार डॉ. अरुण पाटील, श्री. गौरव तिवारी, प्रा. डॉ. शांतनू पवार, प्रा. डॉ. तुषार पाटील, प्रा. करिश्मा चौधरी, प्रा. योगेश वंजारी, क्रीडा संचालक श्री. सागर सोनवणे, प्रा. डॉ. ज्योती जाखेटे, प्रा. डॉ. बिपासा पात्रा, प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. डॉ. जितेंद्र वडदकर आणि श्रीमती नीलिमा चौधरी यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योती जाखेटे आणि ईशा पिप्रिया यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मुकुंद पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन आयक्यूएसीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. योगिता पाटील आणि प्रा. डॉ. स्वाती पाटील यांनी विशेष सहकार्य केले.



.jpeg)
.jpeg)

.jpeg)

Comments
Post a Comment