जी. एच. रायसोनी महाविद्यालयात‘माइंडफुलनेस, स्पिरिचुअलिटी अँड टेक्नॉलॉजी’वर तिसरी राष्ट्रीय परिषद संपन्न

तंत्रज्ञानाला अध्यात्माची दिशा आणि माइंडफुलनेसची जोड काळाची गरज : मार्गदर्शकांचा सूर; ९० हून अधिक संशोधन पेपर, ३०० हून अधिक संशोधकांचा सहभाग; चार विषयाधारित ट्रॅकमध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जळगाव, ता. 3 : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स विभागातर्फे माइंडफुलनेस, स्पिरिच्युअॅलिटी अँड टेक्नॉलॉजी (एनसीएमएसटी)’ या विषयावर तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवनातील सजगता, आध्यात्मिक मूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने अत्यंत समकालीन आणि चिंतनशील विषयावर आयोजित या परिषदेला देशभरातील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिषदेत ९० हून अधिक संशोधन पेपर प्राप्त झाले असून ३०० हून अधिक संशोधकांनी सहभाग नोंदविला. विविध संशोधन विषयांची मांडणी चार विषयाधारित ट्रॅकमध्ये करण्यात आली.

परिषदेच्या अध्यक्ष तथा जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात आजच्या तंत्रज्ञानप्रधान जीवनशैलीत माइंडफुलनेस आणि अध्यात्माच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “आजचे युग हे वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचे युग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडिया यांनी मानवी जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव निर्माण केला आहे. तंत्रज्ञानामुळे ज्ञान आणि माहितीच्या कक्षा व्यापक झाल्या असल्या, तरी या वेगवान प्रवाहात मानवी मनाची शांतता, एकाग्रता आणि अंतर्मुखता टिकवणे तितकेच महत्त्वाचे आहे.”

तंत्रज्ञानाचा वापर केवळ सुविधा आणि कार्यक्षमता वाढविण्यापुरता मर्यादित न ठेवता तो मानवी कल्याणाशी जोडला जाणे आवश्यक असल्याचे प्रा. डॉ. अग्रवाल यांनी स्पष्ट केले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल साधनांचा उपयोग मानसिक आरोग्याच्या गरजा समजून घेण्यासाठी, ध्यानधारणेसाठी, श्वसनसाधनेसाठी तसेच माइंडफुलनेसच्या सरावासाठी करता येऊ शकतो. मात्र, तंत्रज्ञानाच्या अमर्याद वापरासोबत मानवी मूल्ये आणि आत्मिक संतुलन यांचा विचार होणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

तंत्रज्ञान आपल्याला अभूतपूर्व क्षमता आणि गती देते; मात्र त्या क्षमतेचा उपयोग कोणत्या दिशेने करायचा, यासाठी विवेक, मूल्ये आणि आत्मजागरूकता आवश्यक आहे. त्यामुळे माइंडफुलनेस, अध्यात्म आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय हा केवळ चर्चेचा विषय नसून भविष्यातील संतुलित आणि शाश्वत मानवी विकासासाठी आवश्यक असलेला दृष्टिकोन आहे,” असे मत प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी व्यक्त केले.

या राष्ट्रीय परिषदेचे प्रमुख अतिथी तथा इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक पार्थ सारथी प्रभू (प्रमोद पाटील) यांनी आपल्या मार्गदर्शनातून अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यातील सहअस्तित्वाची गरज अधोरेखित केली. तंत्रज्ञान हे मानवी जीवन अधिक सुलभ आणि गतिमान करणारे प्रभावी साधन असले, तरी त्याचा योग्य आणि सकारात्मक वापर करण्यासाठी अंतर्मुखता, सजगता आणि आध्यात्मिक मूल्यांची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. आधुनिक जीवनातील ताणतणाव, अस्थिरता आणि सततच्या डिजिटल व्यस्ततेच्या पार्श्वभूमीवर माइंडफुलनेस व्यक्तीला स्वतःशी जोडण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनीही परिषदेच्या विषयाचे आजच्या तंत्रज्ञानयुगातील महत्त्व विशद केले. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत मानवी विकासाचा केंद्रबिंदू हा माणूसच राहिला पाहिजे. ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञानाबरोबरच मानसिक स्थैर्य, मूल्याधिष्ठित विचार आणि सजगता यांची जोपासना आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

परिषदेच्या समन्वयक तथा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांनी प्रास्ताविकातून या समकालीन विषयाची निवड करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभाव आणि डिजिटल जीवनशैली यामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींबरोबरच मानवी जीवनातील संतुलनाचा प्रश्नही महत्त्वाचा बनला आहे. त्यामुळे माइंडफुलनेस, अध्यात्म आणि तंत्रज्ञान यांचा परस्परसंबंध अभ्यासण्यासाठी संशोधकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा परिषदेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या परिषदेत देशाच्या विविध भागांतील संशोधक आणि विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर संशोधन मांडले. ९० हून अधिक संशोधन पेपर आणि ३०० हून अधिक संशोधकांचा सहभाग ही परिषदेची विशेष ठरलेली बाब होती. संशोधनाचे सादरीकरण चार विषयाधारित ट्रॅकमध्ये करण्यात आल्याने विविध क्षेत्रांतील तंत्रज्ञान, मानवी जीवन, सजगता आणि आध्यात्मिक दृष्टिकोन यांचा परस्परसंबंध अभ्यासण्याची संधी सहभागी संशोधकांना मिळाली.

परिषदेच्या आयोजनातून तंत्रज्ञान आणि मानवी मूल्ये यांच्यातील समतोल, डिजिटल युगातील मानसिक सजगता आणि अध्यात्माची समकालीन उपयुक्तता यावर शैक्षणिक पातळीवर विचारमंथन घडून आले. तंत्रज्ञानाच्या विकासाला मानवी संवेदना, मूल्ये आणि आत्मजागरूकतेची जोड मिळाल्यास अधिक संतुलित आणि अर्थपूर्ण समाजनिर्मितीला चालना मिळू शकते, हा परिषदेचा व्यापक संदेश ठरला.

परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. रुपाली ढाके, प्रा. करिष्मा चौधरी, प्रा. प्रिया टेकवाणी, प्रा. प्रतीक्षा पाटील, प्रा. साक्षी जठार, प्रा. ऋतिका जैस्वाल, प्रा. प्राची मावळे, प्रा. शुभम अडवाल, प्रा. मंगेश देवळे व प्रा. निकी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी समन्वयकांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ‘इंटर्न-ट्रॅक हॅकेथॉन’मध्ये ४५ संघांची कल्पकता पणाला; नाविन्यपूर्ण डिजिटल उपायांची निर्मिती

नवे तंत्रज्ञान, नवी कौशल्ये आणि बदलते शिक्षण : प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, जळगाव