राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात गुणवंत खेळाडूंचा सन्मान

‘अकॅडमिकसोबत स्पोर्ट्सही तितकेच महत्त्वाचे’; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन — मेजर ध्यानचंद यांना अभिवादन

जळगाव, ता. २९ : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अकॅडमिक शिक्षणासोबत क्रीडेलाही तितकेच महत्त्व आहे. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या क्षमतेचा विकास करावा, स्पर्धेत जिंकण्याची जिद्द ठेवावी आणि सातत्यपूर्ण सराव, शिस्त व संघभावनेतून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, असे प्रतिपादन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करत होत्या. रायसोनी महाविद्यालयात क्रीडा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात असून, नुकत्याच झालेल्या खेलोत्सवामध्येही विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  अध्यक्षीय मार्गदर्शन करताना जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या की, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी मोबाईल, संगणक आणि डिजिटल माध्यमांमध्ये अधिक वेळ घालवत आहेत. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळांना जीवनात विशेष स्थान देणे आवश्यक आहे. अकॅडमिक क्षेत्रात चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहेच; मात्र त्यासोबतच स्पोर्ट्समध्ये सहभागी होऊन स्वतःच्या क्षमता ओळखणेही तितकेच गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन स्तरापासून विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, पराभवातून शिकावे आणि प्रत्येक स्पर्धेत विजयी होण्याची सकारात्मक मानसिकता ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. 

क्रीडा विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, संघभावना, संयम आणि आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करते, त्यामुळे क्रीडेकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम म्हणून पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. क्रीडा क्षेत्रामध्ये आज खेळाडू होण्याबरोबरच स्पोर्ट्स मॅनेजमेंट, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, स्पोर्ट्स फिजिओथेरपी, स्पोर्ट्स जर्नालिझम, स्पोर्ट्स अॅडमिनिस्ट्रेशन, फिटनेस ट्रेनिंग, जिम इन्स्ट्रक्टर, अॅथलीट मॅनेजर यांसारख्या विविध क्षेत्रांत करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवतानाच क्रीडा क्षेत्रातील बदलत्या करिअरच्या संधींचाही अभ्यास करावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. विशेषतः विद्यार्थिनींनीही क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील तसेच प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभागप्रमुख सागर सोनावणे यांनी समन्वयाची जबाबदारी सांभाळली. या उपक्रमाच्या आयोजनासाठी मयूर रोटे, चैतन्य पाटील, विक्रांत पवार, प्रथमेश सोनवणे, ओम पटेल, हर्षदा पिंजन, भूमिका माखिजा, नेहा चौधरी आणि विवेक नेरपगारे यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत क्रीडेलाही समान महत्त्व देणे ही रायसोनी संस्थेची भूमिका आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही नवनवे शिखर गाठावे, यासाठी संस्था सदैव त्यांच्या पाठीशी राहील, असे जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी स्पष्ट केले.

या गुणवंत खेळाडूंचा झाला गौरव

बॅडमिंटन : लक्ष राकेश शर्मा — प्रथम, चैतन्य विलास पाटील — द्वितीय, नेहा विजय चौधरी — प्रथम, अभिश्री सुभाष चव्हाण — द्वितीय

टेबल टेनिस : सुजल सारनाथ सोनवणे — प्रथम, तेजस विजय बाविसकर — द्वितीय, नेहा विजय चौधरी — प्रथम, स्वार्धा अशोक वानारे — द्वितीय

टग ऑफ वॉर — विजेता : ओम पटेल, अनुज जोग, शिव वाघ, अर्जुन फाळके, शंतनू पाटील, यश बोर्से, सिद्धांत जाधव, गौरव राजपूत

टग ऑफ वॉर — उपविजेता : गाझी परजादा, हसनैन शेख, उमर शेख, माज शेख, हुजेफा शेख, अबुजार शेख, शाक्झेब शय्यद, हसन शेख

क्रिकेट — विजेता : पियुष मोरे, दीपराज पाटील, यश पाटील, हरीश बोरसे, निशांत शर्मा, दिवेश पाटील

क्रिकेट — उपविजेता : निरज भोजवाणी, अनिश कुकरेजा, आयुष वालेचा, अभी पंजाबी, मोहित वर्मा, सुजल इलवाणी

बॉक्सिंग — जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचा निशांत तडवी याने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पदक मिळविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

क्रीडा मार्गदर्शकांचाही गौरव

क्रीडा उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल प्रा. ज्ञानेश्वर न्हावी, प्रा. तुषार वाघ, प्रा. रणजीत वाघ आणि प्रा. पंकज रंगलानी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.

Comments

Popular posts from this blog

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ‘इंटर्न-ट्रॅक हॅकेथॉन’मध्ये ४५ संघांची कल्पकता पणाला; नाविन्यपूर्ण डिजिटल उपायांची निर्मिती

नवे तंत्रज्ञान, नवी कौशल्ये आणि बदलते शिक्षण : प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, जळगाव