जी. एच. रायसोनी महाविध्यालयात ‘ड्रग्स अवेअरनेस’ अभियान; एसपी धिवरे यांचे प्रभावी मार्गदर्शन

ड्रग्सला नाही, भविष्याला होकार’चा विद्यार्थ्यांना संदेश; ‘मिशन राइज एक्स’ लोगोचे लोकार्पण, स्वयंसेवकांना बॅज वितरण व पथनाट्यातून जनजागृती; पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव, ता. १२ : आजच्या युवकांना केवळ उच्च शिक्षण देऊन भागणार नाही, तर त्यांच्यामध्ये समाजहित, राष्ट्रहित, संस्कार आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणेही तितकेच आवश्यक आहे. युवकांची ऊर्जा आणि क्षमता वाममार्गाला न वळता राष्ट्रनिर्माणासाठी उपयोगात आणायची असेल, तर त्यांना व्यसनापासून दूर ठेवून त्यांच्यात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे गरजेचे आहे. याच उद्देशाने जी. एच. रायसोनी महाविद्यालयात जळगाव जिल्हा पोलीस, 94.3 MY FM आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग्स अवेअरनेस प्रोग्राम’ आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे (भा.पो.से.) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल होत्या. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. संदीप गवित, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणपुरे, पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्डे, जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवकांची शक्ती ही देशाची खरी संपत्ती असल्याचे सांगितले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये योग्य संस्कार, सकारात्मक विचारसरणी आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होणे आवश्यक आहे. अमली पदार्थांच्या आहारी जाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य, शिक्षण, करिअर आणि कौटुंबिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवण्यासोबतच आपल्या मित्रपरिवारालाही व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले. जळगाव जिल्हा पोलीस, 94.3 MY FM आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या वतीने युवकांमध्ये अमली पदार्थांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. ‘सुशिक्षित, सुसंस्कारी आणि व्यसनमुक्त युवक हीच सशक्त राष्ट्राची ओळख आहे,’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्यांविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. अमली पदार्थांचे सेवन ही केवळ व्यक्तीची वैयक्तिक समस्या नसून त्याचे दूरगामी सामाजिक परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा आकर्षणाला बळी न पडता व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवावे, तसेच आपल्या परिसरातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. अमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी योग्य संगत, सकारात्मक विचार, कुटुंबाशी संवाद, शिक्षण आणि ध्येय निश्चिती यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे श्री. धिवरे यांनी नमूद केले. युवकांनी आपल्या क्षमतेचा उपयोग शिक्षण, कौशल्यविकास, क्रीडा, संशोधन आणि राष्ट्रसेवेसाठी करावा, असे त्यांनी सांगितले. अमली पदार्थांविरोधातील लढ्यात केवळ पोलीस यंत्रणाच नव्हे, तर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजाचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्डे यांनी पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे प्रकार, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व आणि अमली पदार्थमुक्त समाज निर्मितीमध्ये युवकांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी ‘ड्रग्स अवेअरनेस’ विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून अमली पदार्थांच्या व्यसनामुळे व्यक्तीच्या जीवनावर होणारे दुष्परिणाम, कुटुंबावर येणारे संकट आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी जळगाव जिल्हा पोलिसांच्या ‘मिशन राइज एक्स’ या अभियानाच्या लोगोचे विद्यार्थ्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच अमली पदार्थांविरोधातील जनजागृती अधिक प्रभावी करण्यासाठी कार्यरत राहणाऱ्या विद्यार्थी स्वयंसेवकांना बॅजचे वितरण करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनमुक्त राहण्यासोबतच इतरांमध्येही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी युवकांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले. युवकांनी स्वतःच्या उज्ज्वल भवितव्यासोबतच समाज आणि राष्ट्राच्या भवितव्याचा विचार करून व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमित माळी यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वय योगाशिक्षक डॉ. कृणाल महाजन, प्रा. वसिम पटेल आणि प्रा. प्रिया टेकवानी यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यसनाला नकार—राष्ट्रनिर्माणाला होकार’ हा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करणारा ठरला. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अशा समाजोपयोगी व जनजागृतीपर उपक्रमांचे स्वागत करत युवकांना योग्य दिशा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ‘इंटर्न-ट्रॅक हॅकेथॉन’मध्ये ४५ संघांची कल्पकता पणाला; नाविन्यपूर्ण डिजिटल उपायांची निर्मिती

नवे तंत्रज्ञान, नवी कौशल्ये आणि बदलते शिक्षण : प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, जळगाव