उद्योगाभिमुख इंटर्नशिपसाठी आवश्यक कौशल्ये व व्यावसायिक शिस्तीवर जी. एच. रायसोनी महाविद्यालयात मार्गदर्शन

प्रमाणित इंटर्नशिप, उद्योगातील संधी, व्यावसायिक आचारसंहिता आणि उद्योजकतेच्या नव्या वाटांबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन

जळगाव, ता. ०७ :  उद्योगाभिमुख शिक्षण, प्रत्यक्ष कार्यानुभव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागात संस्थेच्या इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत एमबीए (द्वितीय वर्ष, तृतीय सत्र) विद्यार्थ्यांसाठी "उद्योगाभिमुख इंटर्नशिपसाठी आवश्यक कौशल्ये व व्यावसायिक शिस्त" या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, उद्योगाभिमुख इंटर्नशिप ही केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्यवृद्धी आणि व्यावसायिक जडणघडणीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, शिस्त, जबाबदारीची जाणीव, प्रभावी संवादकौशल्य, संघभावना, समस्या सोडविण्याची क्षमता, सकारात्मक दृष्टीकोन आणि व्यावसायिक नैतिकता यांसारखी कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. उद्योगविश्वातील बदलत्या गरजांनुसार स्वतःला सातत्याने अद्ययावत ठेवत प्रत्यक्ष कामातून शिकण्याची वृत्ती विकसित केल्यास विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतात. तसेच, इंटर्नशिपच्या माध्यमातून मिळणारा अनुभव विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना सक्षम व्यावसायिक, कुशल व्यवस्थापक आणि यशस्वी उद्योजक बनण्यास मोलाची मदत करतो, असे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या अधिष्ठाता कौशिकी सोंधी यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणित इंटर्नशिपच्या संधी, महाविद्यालयाची इंटर्नशिप मंजुरी प्रक्रिया, कंपनी पडताळणी, आवश्यक कागदपत्रे, कार्यस्थळावरील व्यावसायिक आचारसंहिता तसेच उद्योगातील अपेक्षा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप ही केवळ शैक्षणिक औपचारिकता नसून प्रत्यक्ष उद्योगातील अनुभव, कौशल्यविकास आणि नाविन्यपूर्ण विचारांना चालना देणारी संधी असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी स्टार्टअप्स आणि एमएसएमई (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) क्षेत्रातील उपलब्ध संधींची माहिती देत, इंटर्नशिपदरम्यान उद्योगांतील समस्या ओळखून त्यावर संशोधन, नवकल्पना किंवा उद्योजकीय संधी विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

कार्यक्रमाचे समन्वयन इन्क्युबेशन सेलच्या प्रभारी व एमबीए इंटर्नशिप समन्वयक प्रा. डॉ. ज्योती जाखेटे यांनी केले. हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी २०२०), राष्ट्रीय इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी (एनआयएसपी) आणि शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजीज्) यांच्या उद्दिष्टांशी सुसंगत होता.

सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रमाणित इंटर्नशिप, संस्थात्मक कार्यपद्धती, व्यावसायिक मूल्ये तसेच उद्योगाभिमुख आणि उद्योजकीय करिअरविषयी अधिक जागरूकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांना उद्योगसज्ज करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन सत्राचे रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला आणि उज्ज्वल करिअर घडविण्यास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण