जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “डॉक्टर डे” उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचा संदेश
सुप्रसिद्ध डॉ. ज्योती हिराणी यांचे मार्गदर्शन; संगीत, स्किट आणि संवादातून आरोग्याविषयी जनजागृती
जळगाव,१ : जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये 'डॉक्टर डे' विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी
उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी
जागरूकता निर्माण करणे, निरोगी
जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे आणि डॉक्टरांच्या समाजातील योगदानाबद्दल कृतज्ञता
व्यक्त करणे, हा
या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. ज्योती रविकुमार
हिराणी यांची उपस्थिती लाभली. शाळेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी
आणि शाळेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या आकर्षक सांस्कृतिक
सादरीकरणाने झाली. इयत्ता पाचवी, सहावी
आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी म्युझिकल सॉंगने
उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आरोग्य, स्वच्छता आणि डॉक्टरांचे समाजातील महत्त्व
अधोरेखित करणारे प्रभावी स्किट सादर केले. विद्यार्थ्यांच्या अभिनयाला उपस्थितांनी
उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. ज्योती हिराणी यांनी
निरोगी आणि आनंदी जीवनासाठी आवश्यक असलेल्या पाच महत्त्वपूर्ण घटकांवर विशेष भर
दिला. पुरेसे पाणी, संतुलित
आहार, पुरेशी
झोप, चांगले
मित्र आणि शुद्ध ऑक्सिजन हे निरोगी आयुष्याचे पाच मजबूत आधारस्तंभ असल्याचे
त्यांनी सांगितले. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या समस्यांवर
भाष्य करत त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम, सकस आहार आणि सकारात्मक विचारसरणी
अंगीकारण्याचे आवाहन केले.
जंक फूडच्या वाढत्या सवयीबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना
जागरूक केले. "जंक फूड काही क्षणांची चव आणि आनंद देत असले, तरी त्याचे आरोग्यावर दीर्घकालीन
दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे घरगुती, पौष्टिक आणि संतुलित आहाराला प्राधान्य द्या," असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी स्कूलच्या मुख्याध्यापिका
क्रिस्टाबेल परेरा यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. आपल्या मनोगतात त्यांनी
विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी सवयी अंगीकारून शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे
ही काळाची गरज असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये
आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन त्यांना निरोगी जीवनाची प्रेरणा
मिळते, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत डॉक्टर डे केवळ एक औपचारिक दिवस न
राहता आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरवला.
Comments
Post a Comment