जी. एच. रायसोनी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ संकल्पनेवर विशेष सत्र; महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाचे धडे
जळगाव, ता. २० : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला "Yoga for Healthy Ageing" या संकल्पनेवर आधारित विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले. मॅनेजमेंट बिल्डिंगमधील सेमिनार हॉल येथे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक तसेच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिके सादर केली तसेच निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनासाठी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एच. आर. विभागाचे मयूर गोपाले, स्वाती शिवणकर तसेच समीक्षा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात योगाच्या जागतिक स्वीकाराबद्दल भाष्य केले. त्यांनी
सांगितले की, योग
ही केवळ व्यायामपद्धती नसून जीवन जगण्याची एक वैज्ञानिक आणि समग्र कला आहे.
योगामुळे व्यक्तीचा शारीरिक, मानसिक,
बौद्धिक आणि
आध्यात्मिक विकास घडून येतो. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर अभ्यास,
करिअर आणि विविध
जबाबदाऱ्यांचा ताण वाढत असताना योग त्यांना मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन
प्रदान करतो. भारताने जगाला दिलेली योग ही अनमोल देणगी आज संपूर्ण जग स्वीकारत
आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मन शांत राहते आणि जीवनशैलीशी संबंधित
अनेक आजारांपासून बचाव होतो. विद्यार्थ्यांनी दररोज काही वेळ योगासाठी राखून
ठेवावा आणि त्याचा जीवनशैलीचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच
"निरोगी विद्यार्थी, सक्षम
युवा आणि सशक्त राष्ट्र" घडविण्यासाठी योग संस्कृतीचा प्रसार आवश्यक असल्याचे
त्यांनी नमूद केले.
या योग सत्रासाठी महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे विभाग प्रमुख सुनील गुरव, सचिव सोनाली पाटील, सचिव पल्लवी उपासनी, निसर्गोपचार समिती प्रमुख डॉ. सोनल महाजन तसेच निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. अनंत महाजन हे प्रमुख पाहुणे व प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुनील गुरव यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व समजावून सांगत मार्गदर्शन केले. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारा ताण, मानसिक अस्वस्थता आणि शारीरिक व्याधी यांवर योग हा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न राहते आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यामध्ये ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, त्रिकोणासन, वज्रासन, पवनमुक्तासन, शवासन, सूर्यनमस्कार तसेच अनुलोम-विलोम व कपालभाती प्राणायाम यांचा समावेश होता. प्रत्येक आसनाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम समजावून सांगत त्यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष योगाभ्यास करून घेतला. योग्य श्वसनपद्धती, शरीराची ठेवण, एकाग्रता आणि आत्मनियंत्रण याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. सोनल महाजन व डॉ. अनंत महाजन यांनी योग व निसर्गोपचार यांचे परस्परसंबंध स्पष्ट करत निरोगी जीवनशैलीसाठी योग, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व विशद केले. तसेच मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी ध्यानधारणा व प्राणायाम यांचा नियमित सराव आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनीही विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगशिक्षक कृणाल महाजन यांनी समन्वय साधला. महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना पौष्टिक प्रथिनयुक्त मोड आलेल्या कडधान्यांचा नाश्ता तसेच आरोग्यवर्धक आयुर्वेदिक काढ्याचे वितरण करण्यात आले. यामुळे योगासोबतच संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा संदेशही देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्व आयोजक, प्रशिक्षक व सहभागींचे अभिनंदन केले.


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
Comments
Post a Comment