जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फिट नारी – हिट नारी’ उपक्रम ; महिला दिनानिमित्त आरोग्य, फिटनेस आणि सशक्तीकरणाचा संदेश

महापौर दीपमाला काळे यांच्यासह शहरातील रनर ग्रुपच्या प्रतिष्ठित महिला सदस्यांचा सत्कार; क्रीडापटू विद्यार्थिनींचा गौरव

जळगाव, ता. ६ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात “फिट नारी – हिट नारी” या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “गिव्ह टू गेन – लेट्स सेलिब्रेट स्ट्रेंथ अँड स्पिरिट ऑफ वुमनहूड विथ पॅशनेट फिटनेस एन्थुजिअस्ट्स!” या थीमवर आयोजित या कार्यक्रमातून महिलांच्या आरोग्य, फिटनेस आणि सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला. यावेळी जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांच्यासह शहरातील रनर ग्रुपच्या प्रतिष्ठित महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रस्ताविक करताना या उपक्रमामागील भूमिका सविस्तर स्पष्ट केली. आजच्या वेगवान जीवनशैलीत महिलांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “फिट नारी – हिट नारी” ही संकल्पना केवळ व्यायामापुरती मर्यादित नसून ती आत्मविश्वास, आरोग्यदायी जीवनशैली आणि सकारात्मक विचारांची जाणीव करून देणारी आहे. समाजातील महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तर त्या कुटुंब आणि समाजालाही सक्षम बनवू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

याच अनुषंगाने जळगाव शहरातील महिलांमध्ये फिटनेस, आरोग्यदायी जीवनशैली आणि धावण्याची संस्कृती रुजविण्यासाठी कार्यरत असलेल्या रनर ग्रुपच्या सदस्यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे या स्वतःही रनर ग्रुपच्या सक्रिय सदस्य असून त्यांनी शहरातील महिलांना फिटनेस आणि आरोग्याबाबत प्रेरित करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्यासह रनर ग्रुपमधील इतर प्रतिष्ठित महिला सदस्यांनी देखील विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत समाजात प्रेरणादायी कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला जळगाव शहराच्या महापौर श्रीमती दीपमाला काळे, प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सोनाली महाजन, डॉ. रती महाजन, श्रीमती विद्या ताई बेंडाले तसेच शहरातील रनर ग्रुपच्या सदस्यांसह अनेक प्रतिष्ठित महिलांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात या मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना महापौर दीपमाला काळे यांनी प्रत्येक तरुणीने आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेत फिट राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. महिलांनी महिलांसाठी पुढाकार घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा, तसेच नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच रनर ग्रुपच्या सदस्या व  वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सोनाली महाजन यांनी महिलांच्या आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या काळात प्रत्येक महिलेसाठी फिट राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जीवनात अनेक आव्हाने असतात, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य मजबूत असणे आवश्यक आहे. शारीरिक तंदुरुस्तीमुळे शरीर निरोगी राहते तर मानसिक तंदुरुस्तीमुळे आत्मविश्वास वाढतो आणि कोणतीही समस्या धैर्याने हाताळता येते, असे त्यांनी सांगितले. योग्य पोषण हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, कारण चांगला आहार शरीराला ऊर्जा देतो. यासोबतच आध्यात्मिक संतुलन आणि शिस्त या गोष्टी जीवनाला योग्य दिशा देतात. म्हणून प्रत्येक स्त्रीने आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक विचार यांचा स्वीकार करून “फिट नारी – हिट नारी” हा संदेश समाजात पोहोचवावा, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. खान्देशातील अभियांत्रिकी व मॅनेजमेंट क्षेत्रातील अग्रगण्य ऑटोनॉमस महाविद्यालय म्हणून जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नॅककडून महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाल्याबरोबरच ते “ए” ग्रेडने सन्मानित झाले असून यामागे प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे अथक परिश्रम व कार्यकर्तृत्व आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यशाळा व उपक्रम त्या सातत्याने आयोजित करत असतात.

याच प्रसंगी महाविद्यालयातील क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचाही गौरव करण्यात आला. सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षात विविध क्रीडा प्रकारांच्या आंतर–विद्यापीठ स्पर्धांसाठी महाविद्यालयातील १२ खेळाडूंची निवड झाली होती.

बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात आस्था महेंद्र अबोटी (बी.टेक तृतीय वर्ष) हिने सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, पुणे येथे आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदविला. मल्लखांब या क्रीडा प्रकारात ईशिका अमित लखवाणी (बीसीए – द्वितीय वर्ष) हिने एल.एन.सी.टी. युनिव्हर्सिटी, भोपाळ येथे झालेल्या स्पर्धेत सहभाग घेतला.

बास्केटबॉल या क्रीडा प्रकारात धनश्री संदीपकुमार पाटील खुशी महेंद्र सुर्वंशी (दोन्ही बी.टेक – तृतीय वर्ष) यांनी लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, ग्वाल्हेर येथे झालेल्या स्पर्धेत सहभाग घेतला. टेबल टेनिसमध्ये योगेश्वरी भगवान भोंइ वेदांती विनोद पाटील (दोन्ही बी.टेक – चतुर्थ वर्ष) यांनी वीर नर्मद साउथ गुजरात युनिव्हर्सिटी, सुरत येथे आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदविला.

फुटबॉलमध्ये मेहक सय्यद अली टाकरी (बी.टेक – प्रथम वर्ष) हिने अवधेश प्रताप सिंह युनिव्हर्सिटी, रेवा (मध्य प्रदेश) येथे झालेल्या स्पर्धेत सहभाग घेतला. तर सेपक टकरा या क्रीडा प्रकारात नेहा विजय चौधरी (एमबीए – प्रथम वर्ष), गौरी संतोष पाटील (बीसीए – प्रथम वर्ष), मिताली मिलिंद पगारे (बीसीए – प्रथम वर्ष), जुबैन सादिक शेख (बी.टेक – प्रथम वर्ष) व प्राची राजू नावसे (बी.टेक – तृतीय वर्ष) यांनी आसाम युनिव्हर्सिटी, सिलचर (आसाम) येथे आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदविला.

या सर्व खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रा. बिपासा पात्रा, प्रा. श्रिया कोगटा, प्रा. मृदुला देशपांडे, आणि प्रा. ज्योती जाखेटे यांनी समन्वय साधत कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाच्या यशाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्व आयोजकांचे कौतुक व अभिनंदन केले.


साठीनंतरही धावण्याची जिद्द”, “फिटनेसची प्रेरणा – विद्याताई बेंडाळे”

शहरातील जळगाव रनर्स ग्रुप या धावपटूंच्या संघटनेशी संलग्न असलेल्या ज्येष्ठ धावपटू श्रीमती विध्याताई बेंडाळे  या आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वयाच्या साठीनंतरही त्यांनी धावण्याची आवड जपली असून विविध मॅरेथॉन व रनिंग स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत त्या फिटनेसचा आदर्श निर्माण करत आहेत.

विद्या बेंडाळे यांनी अनेक शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १०, २५, ४२, ९० किलोमीटर तसेच मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध दिनचर्या आणि आरोग्याबाबतची जागरूकता यांच्या जोरावर त्यांनी धावण्याच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जळगावातील रनिंग संस्कृती वाढविण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. जळगाव रनर्स ग्रुप  च्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्या नवोदित धावपटूंना प्रोत्साहन देत असतात. वय हे केवळ एक आकडा असून इच्छाशक्ती आणि नियमित सरावाच्या बळावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे त्यांनी आपल्या कृतीतून व  विध्यार्थिनीना मार्गदर्शन करतांना नमूद केले.

त्यांच्या या जिद्दीमुळे जळगावातील अनेक तरुण आणि महिलांमध्ये धावण्याबद्दलची प्रेरणा निर्माण होत असून फिटनेसकडे वळण्याचा सकारात्मक संदेशही समाजात पोहोचत आहे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण