जी. एच. रायसोनी महाविद्यालयात रंगली ‘अभिरूप युवा संसद’
लोकसभेतील कामकाज व संसदीय चर्चेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी “रोटरेक्ट क्लब ऑफ रायसोनी”चा पुढाकार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव, ता. ५ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकासात्मक उपक्रमांची परंपरा सातत्याने जोपासली जाते. त्याच अनुषंगाने “रोटरेक्ट क्लब ऑफ रायसोनी”तर्फे यावर्षीही “अभिरूप युवा संसद” हा उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. लोकसभेतील कामकाज नेमके कसे चालते, मंत्री व खासदारांच्या जबाबदाऱ्या काय असतात, तसेच मतदारसंघांचे प्रतिनिधित्व कशा प्रकारे केले जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
यावेळी जी. एच.
रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या प्रमुख मार्गदर्शक
म्हणून उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी लोकशाही व्यवस्थेत
संसदीय पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. युवकांनी केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते
मर्यादित न राहता सामाजिक व राजकीय घडामोडींची जाणीव ठेवावी, संसदीय लोकशाहीचा
अभ्यास करावा, विचार मांडताना संयम, तर्कशुद्धता आणि
सभ्य संवाद यांचा अवलंब करावा, असे त्यांनी
सांगितले. युवा संसदेसारखे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, वक्तृत्वकला, हजरजबाबीपणा, विश्लेषण क्षमता व
जबाबदारीची जाणीव विकसित करतात, असेही त्यांनी नमूद
केले.
यावर्षीच्या युवा
संसदेत एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. प्रथम फेरीत प्रत्येक सहभागी
विद्यार्थ्याने आपापल्या राज्याचे प्रतिनिधित्व करत त्या राज्याची संस्कृती, परंपरा, सामाजिक वैशिष्ट्ये
व विकासाची माहिती प्रभावीपणे मांडली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी संबंधित
राज्याची पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदवला, त्यामुळे वातावरण
अधिक वास्तवदर्शी व रंगतदार झाले.
दुसऱ्या फेरीत संसदेत
मांडल्या जाणाऱ्या विधेयकांच्या धर्तीवर सहभागींनी आपापली बिले मांडली. एखाद्या
विधेयकास समर्थन किंवा आक्षेप नोंदवणे, विद्यमान कायद्यात
बदल सुचवणे अथवा तो रद्द करण्याची मागणी करणे, अशा संसदीय
पद्धतीनुसार चर्चा व वादविवाद रंगले.
तिसऱ्या फेरीत प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेण्यात आला. यात
पंतप्रधान, गृहमंत्री, सभापती, विरोधी
पक्षनेते व मंत्रिमंडळाची भूमिका विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे साकारली. परस्परांतील
प्रश्नोत्तरांमधून संसदीय परंपरा,
शिस्त व चर्चेचे
महत्त्व अधोरेखित झाले.
या युवा संसदेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ग्लोबल अर्थव्यवस्था, जागतिक युद्ध, सार्वजनिक हिताचे प्रश्न तसेच
अर्थसंकल्पामुळे देशातील आर्थिक बदल यांसारख्या समकालीन विषयांवर सखोल चर्चा झाली.
खऱ्याखुऱ्या संसदेसारखे वातावरण निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी लोकशाहीतील
वाद-संवादाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले.
यावर्षीच्या उपक्रमासाठी प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. रफिक शेख, प्रा. हर्षल कोतवाल व प्रा. श्रिया कोगटा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धेला अधिक दर्जा प्राप्त झाला.
उत्स्फूर्त प्रतिसाद, शिस्तबद्ध सादरीकरण आणि विचारप्रवर्तक चर्चेमुळे “अभिरूप युवा संसद” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी व्यक्त केली.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment