जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “कश्ती–२०२६” या विद्यापीठस्तरीय मॅनेजमेंट फेस्टचे उत्साहात आयोजन

नावीन्य, उद्योजकता व नेतृत्व कौशल्यांवर आधारित विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध महाविद्यालयांतील २०० हून अधिक संघांचा सहभाग

जळगाव, ता. १० : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे व्यवस्थापन विभागाच्या वतीने विद्यापीठस्तरीय दोन दिवसीय मॅनेजमेंट युवा महोत्सव “कश्ती–२०२६” चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावर्षी नाविन्य, उद्योजकता, क्रिएटिव्हिटी व नेतृत्व विकास या संकल्पनांवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या मॅनेजमेंट फेस्टच्या उद्घाटनप्रसंगी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. व्यासपीठावर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील तसेच प्रा. डॉ. विशाल राणा हे मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शनात संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केवळ अभ्यासक्रमापुरते शिक्षण पुरेसे नसून, त्यांना प्रत्यक्ष अनुभव, क्रिएटिव्हिटी, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याच उद्देशाने जी. एच. रायसोनी महाविद्यालयात दरवर्षी ‘कश्ती’ या विद्यापीठस्तरीय मॅनेजमेंट फेस्टचे आयोजन करण्यात येते, ज्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

आजच्या स्पर्धात्मक व बदलत्या उद्योगविश्वात नाविन्य, उद्योजक दृष्टिकोन आणि कौशल्याधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थापन व उद्योगक्षेत्रातील वास्तव परिस्थितीचा अनुभव मिळतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने संशोधन, नवोपक्रम, बहुविध शैक्षणिक संधी आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व उद्योजकतेसाठी सक्षम घडविण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न असल्याचे प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

या दोन दिवसीय महोत्सवात रायसोनी शार्क टँक – बिझनेस प्लॅन स्पर्धा, डिजिटल अ‍ॅड-मॅड शो, कल का नायक, बी-क्विझ (बिझनेस क्विझ), बुल्स व्हर्सेस बेअर्स (स्टॉक मार्केट सिम्युलेशन), बोर्ड रूम बॅटल (केस स्टडी कॉम्पिटिशन) तसेच पोस्टर प्रेझेंटेशन (एन्व्हायर्नमेंटल सस्टेनेबिलिटी) अशा विविध स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपली व्यावसायिक दृष्टी, निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण प्रभावीपणे सादर करत परीक्षक व प्रेक्षकांची दाद मिळवली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध महाविद्यालयांमधील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या मॅनेजमेंट फेस्टमध्ये सहभाग नोंदविला.

स्पर्धांचे परीक्षण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापक व उद्योग प्रतिनिधींनी केले. बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गिरीश कुलकर्णी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यवस्थापन विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी समन्वयक तसेच स्टुडंट व्हॉलंटिअर्सनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रिया कोगटा यांनी केले.

यांनी मिळवली विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके

‘कल का नायक’ या स्पर्धेत हर्षदा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. विपुल परदेश याने द्वितीय, तर अलिशा तेल हिने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी प्रियंका शर्मा व स्वप्नील श्रवणे यांची निवड करण्यात आली.

‘रायसोनी शार्क टँक’ स्पर्धेत निर्मल वरखेडे व गायत्री व्यवहारे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विश्वजीत पवार याने द्वितीय, तर विवेक, शिव, निशा व चांदणी या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी गोविंद यादव, शिवम यादव तसेच मुद्दस्सिर व अल्तमश यांची निवड झाली.

‘पोस्टर प्रेझेंटेशन’ स्पर्धेत नेहा चौधरी व भूमिका माखिजा यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपली कल्पकता सादर केली. देवयानी बागुल व मेहक तडवी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय पारितोषिकासाठी खुशी सूर्यवंशी व धनश्री पाटील, तर उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी रितुल नाईक व सलोनी जाधव यांची निवड करण्यात आली.

‘बी-क्विझ’ स्पर्धेत कार्पेडियम संघाने प्रथम क्रमांक पटकावला. एसजीडीपी संघाने द्वितीय, एक्स-मॅन संघाने तृतीय, तर गोल्डन कीज संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला.

‘बोर्ड रूम बॅटल’ या स्पर्धेत सत्विक दीक्षित याने प्रथम क्रमांक मिळवला. भूमिका माखिजा व आयुष जवर यांनी द्वितीय, तर कनिष्का वाघ, मोक्षदा चौधरी व दुर्वा महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिक प्रेम कुकरेजा याला देण्यात आले.

‘डिजिटल अ‍ॅड मॅड शो’ स्पर्धेत नकुल सोनवणे व शिवम जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला. मिताली सोनवणे, प्रिया बारी व चुनीष्का चिरमाडे यांनी द्वितीय, तर संकेत भेंडे व वेदान सिंग यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी मयूर मोरे, आदेश सोनवणे, योगिनी पाटील व धनश्री पाटील यांची निवड झाली.

‘बुल व्हर्सेस बेअर’ स्पर्धेत ओम बल्लाळ व आयुष जवर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर सोहम पाटील व भावेश पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण