स्व. ग्यानचंदजी रायसोनी यांच्या पुण्यस्मरणार्थ जी. एच. रायसोनी महाविध्यालयात भव्य महारक्तदान शिबिर संपन्न

११० रक्तपिशव्यांचे यशस्वी संकलन ; विद्यार्थी-प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव, ता. ४ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे प्रेरणास्थान स्व. ग्यानचंदजी रायसोनी यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते स्व. ग्यानचंदजी रायसोनी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी या उपक्रमामागील प्रेरणा विशद केली. त्यांनी रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांचे वडील स्वर्गवासी श्री. ग्यानचंदजी रायसोनी यांच्या कष्टाळू वृत्ती, मूल्याधिष्ठित जीवनशैली व समाजाशी असलेली नाळ हीच या महारक्तदान उपक्रमामागील खरी प्रेरणा असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिबिराच्या कालावधीत रक्तदात्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांचे मनोबल वाढविले.

शिबिरादरम्यान विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना रक्तसंकलन प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

या महारक्तदान शिबिरात एकूण ११० रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केले. शिबिराच्या समारोपावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी श्री. प्रदीप पालवी व डॉ. श्रद्धा गायगोले यांनी महाविद्यालयास स्मृतीचिन्ह व गौरवपत्र प्रदान करून आभार व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांचा उत्साह व शिबिराचे सुव्यवस्थित आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रायसोनी महाविध्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य समन्वयक प्रा. अमोल जोशी यांनी संयोजनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी उपस्थित होत्या. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी आयोजक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण