जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे

विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण; प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन 

जळगाव, ता. २९  : येथील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात “उमंग–२०२५” या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांच्या हस्ते फीत कापून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी सांगितले की, महाविद्यालयीन जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनाला विशेष महत्त्व आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो तसेच त्यांचा मानसिक, बौद्धिक व शारीरिक विकास घडून येतो. आजचे विद्यार्थी हे देशाचे उज्ज्वल भविष्य असून शिक्षणासोबतच कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात संधी मिळाल्यास ते सुदृढ नागरिक घडतील. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार देऊन उत्तम नागरिक घडविणे हे शिक्षकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

ता. २७ व २८ डिसेंबर रोजी आयोजित या स्नेहसंमेलनात नृत्य, गायन, डिपार्टमेंट वॉर, पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, डे सेलिब्रेशन तसेच फॅशन शो यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी मोह मोह के धागे, मेरे कॉलेज की लड़की, झिंग झिंग झिंगाट, एक राधा एक मीरा, राधा ही बावरी, नवरी नटली, तनहाई तनहाई, अच्छा चलते हैं, दुआओं में याद रखना यांसारखी बहारदार गीते सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षक विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेतला. स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. निकिता वालेचा, प्रा. प्रियंका मल, प्रा. शीतल किनगे, प्रा. नैना चौधरी, प्रा. मीनाक्षी पाटील, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. नेहा लुनिया, प्रा. संदीप पाटील, प्रा. राहुल यादव, प्रा. अभिषेक सुरेया, अनिल सोनार व संतोष मिसाळ यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल चौधरी, तनिष्क जावरे, जान्हवी राठोड व युसरा मीर या विद्यार्थ्यांनी केले.सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व यशस्वी आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी महाविध्यालयाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण