जी. एच. रायसोनी महाविध्यालयात ५ हजार वृक्ष लागवडीचा निर्धार ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांची ‘प्रत्येक वाढदिवशी एक झाड’ संकल्पना
महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणातून हरित भविष्याचा संदेश; ‘एक व्यक्ती – एक झाड’ संकल्पनेच्या जागरासाठी ४,७०० विद्यार्थी व ३०० प्राध्यापकांचा सहभाग
जळगाव, ता.
०५ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात
‘विश्व पर्यावरण दिन’ विविध पर्यावरणपूरक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्त महाविद्यालय परिसरात जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा.
डॉ. प्रिती अग्रवाल व प्राध्यापकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण
संवर्धनाचा संदेश देत नैसर्गिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करताना जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित
केले. त्या म्हणाल्या, "आपण
पर्यावरणाची काळजी घेतल्यास, निसर्ग
आपोआप आपली काळजी घेईल. ‘एक व्यक्ती – एक झाड’ ही संकल्पना प्रत्येकाने अंगीकारली
पाहिजे. केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्या वृक्षांचे संगोपन करणेही तितकेच
आवश्यक आहे."
याच अनुषंगाने त्यांनी "प्रत्येक वाढदिवशी एक झाड"
ही संकल्पना महाविद्यालयात राबविण्याचा प्रस्ताव मांडला. सध्या महाविद्यालयात
सुमारे ४,७००
विद्यार्थी आणि ३०० प्राध्यापक कार्यरत असून, या सर्वांनी आपल्या वाढदिवसानिमित्त
किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केल्यास येत्या वर्षभरात ५,००० हून अधिक वृक्षांची लागवड होऊ शकते,
असे त्यांनी नमूद
केले. वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस न राहता तो समाज आणि पर्यावरणासाठी
योगदान देण्याची संधी म्हणून साजरा व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमामुळे
महाविद्यालय परिसरासह संपूर्ण समाजात पर्यावरण संवर्धनाची प्रभावी चळवळ निर्माण
होईल, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संकल्पनेला उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी
उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन, पाणी व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त परिसर आणि पर्यावरणपूरक
जीवनशैलीचा अवलंब यावरही भर देण्यात आला. अशा छोट्या कृतींमधून पर्यावरण रक्षणाची
मोठी चळवळ उभी राहू शकते आणि भावी पिढ्यांसाठी हरित व शाश्वत भविष्य घडविण्यात
मोलाचे योगदान देता येईल, असा
विश्वास प्रा. डॉ. अग्रवाल यांनी व्यक्त केला.
या उपक्रमास अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रजिस्ट्रार श्री. अरुण पाटील, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख
प्रा. डॉ. मुकुंद पाटील, सिव्हिल
अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.
डॉ. चेतन चौधरी, इलेक्ट्रॉनिक्स
अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील, डेटा सायन्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स
विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटील तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख
प्रा. जितेंद्र वढदकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या नियोजन व
समन्वयाची जबाबदारी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. बिपासा पात्रा
आणि प्रा. राहुल पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली.
पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी केवळ एका दिवसापुरती मर्यादित न
ठेवता ती आयुष्यभर जपण्याचा निर्धार व्यक्त करत महाविद्यालयातील विद्यार्थी व
प्राध्यापकांनी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी मांडलेल्या संकल्पनेला
उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वतःच्या प्रत्येक वाढदिवशी किमान एक वृक्ष लावून
त्याचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या माध्यमातून येत्या वर्षभरात
सुमारे ५,०००
वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून पर्यावरण
संरक्षणाबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्व सहभागी प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले. वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.



Comments
Post a Comment