यशस्वी भविष्यासाठी नॉलेज, अ‍ॅटिट्यूड व स्किलची त्रिसूत्री आत्मसात करा : संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील अभियांत्रिकी व मॅनेजमेंट शाखेतील अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

जळगाव, ता. ८ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील अभियांत्रिकी व मॅनेजमेंट शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच महाविद्यालयाच्या प्रशस्त गेस्ट हाऊस लॉनवर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रम, मनोरंजनात्मक सादरीकरणे तसेच भावनिक क्षणांनी भरलेले मनोगत सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या उपस्थित होत्या. तसेच अॅकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, अभियांत्रिकी व मॅनेजमेंट विभागांचे सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून प्रत्येक विद्यार्थ्याने “नॉलेज, अॅटिट्यूड आणि स्किल” ही यशाची त्रिसूत्री आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून सतत नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवली, तरच करिअरमध्ये मोठ्या संधी निर्माण होतात. आपल्या कामाप्रती असलेली प्रामाणिकता, सातत्य आणि कठोर मेहनतच माणसाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवते. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवावी, मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावे, कारण यश हे एका दिवसात मिळत नसून सातत्यपूर्ण प्रयत्नातून घडत असते. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीचा विचार न करता उद्योजकतेकडेही सकारात्मक दृष्टीने पाहावे, स्वतःमध्ये नेतृत्वगुण विकसित करावेत तसेच समस्या सोडविण्याची क्षमता आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारावा, असेही त्यांनी नमूद केले. 

बदलत्या औद्योगिक क्षेत्रात टेक्नॉलॉजीचे वाढते महत्त्व अधोरेखित करत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल कौशल्ये आणि नवकल्पनांच्या युगात विद्यार्थ्यांनी सतत अपडेट राहण्याचे आवाहन केले. तसेच “आई-वडील हेच आपल्या आयुष्यातील पहिले गुरु असतात. त्यांच्या संस्कारांचा आणि मार्गदर्शनाचा आदर करत पुढील वाटचाल केली, तर आयुष्यात यश निश्चित मिळते,” असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. रफिक शेख व प्रा. वसीम पटेल यांनी यशस्वी आयोजनाची जबाबदारी पार पाडली. तसेच प्रा. कल्याणी नेवे, प्रा. पूजा चौधरी, प्रा. अमोल जोशी, प्रा. पूजा नवल, प्रा. सौरभ नाईक, प्रा. राहुल खंडारकर, प्रा. राधेश्याम कुमार आदींनी सहकार्य केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनुभवांबद्दल भावना व्यक्त करत प्राध्याकांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी सुरुची भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्व आयोजक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण