जी. एच. रायसोनी महाविध्यालयात एमबीए-बीबीए विभागाची प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न

संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, कौशल्य विकास व रोजगाराभिमुख शिक्षणावर विशेष भर, पालकांच्या सक्रिय सहभागाची गरज अधोरेखित

जळगाव, ता. १७ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील एमबीए व बीबीए विभागाची प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेसाठी जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील यांनी प्रास्ताविकातून पालक सभेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत महाविद्यालयाचा वार्षिक आढावा सादर केला.

यानंतर प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या स्पर्धात्मक आणि गतिमान जीवनशैलीत विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत असून त्याचा त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधून त्यांचे भावनिक व मानसिक आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, केवळ सैद्धांतिक शिक्षण न देता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित आणि कौशल्याधारित शिक्षण मिळावे, यासाठी महाविद्यालय विविध उद्योगसंस्थांशी सामंजस्य करार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रॅक्टिकल नॉलेज, इंटर्नशिप, प्रोजेक्ट्स आणि विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने महाविद्यालयात मेजर-मायनर प्रणाली, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट तसेच मल्टी-डिसिप्लिनरी शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या धोरणामुळे विद्यार्थ्यांना अधिक लवचिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार असून संशोधन, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी स्वअनुशासन, वेळेचे नियोजन आणि सातत्य यांचा अंगीकार करणे अत्यंत आवश्यक असून यशस्वी करिअरसाठी हीच मूलभूत तत्त्वे असल्याचा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत असल्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरणेही त्यांनी मांडली.

या चर्चासत्रादरम्यान पालकांनी विविध प्रश्न विचारून संवाद साधला. प्रा. डॉ. अग्रवाल यांनी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत पालकांच्या शंकांचे निरसन केले. पालकांनी महाविद्यालयातील शिक्षणपद्धती, सुविधा व उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सहकार्याची तयारी दर्शवली.

प्रा. डॉ. विशाल सुनिल राणा, प्रा. प्राची जगवाणी यांच्यासह एमबीए-बीबीए विभागातील सर्व प्राध्यापकांनी या सभेच्या आयोजनात समन्वयाची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. तन्मय भाले यांनी केले.

या सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण