जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘डीपेक्स २०२६’ : कल्पना, संशोधन आणि नवप्रयोगांचे व्यासपीठ
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजन; आयडिया प्रेझेंटेशन राऊंडमध्ये संशोधन, उद्योजकता व सामाजिक प्रश्नांवर मंथन
३५ वर्षांची नवसर्जनशीलता आणि प्रोत्साहनाची उज्ज्वल परंपरा
लाभलेल्या ‘डीपेक्स’ उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध
क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण कल्पना सादर केल्या. यामध्ये शाश्वत नागरी पायाभूत
सुविधा व कचरा व्यवस्थापन,
ओपन इनोव्हेशन, संगणकीय बुद्धिमत्ता, संरक्षण
व सायबर सुरक्षा, औद्योगिक स्वयंचलन व मोबिलिटी, आरोग्यसेवा व वैद्यकीय तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान,
सुरक्षितता प्रणाली तसेच
ऊर्जा या विषयांचा समावेश होता. महाविध्यालयात संबंधित संकल्पनांचे सादरीकरण
विभागनिहाय कक्षांमध्ये करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जळगाव येथील प्रसिद्ध
उद्योजक तसेच केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे भरत अमळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून
उपस्थित होते. व्यासपीठावर रायसोनी महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल, स्पेक्ट्रम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक
नरेंद्र वाघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे भुसावळ
प्रमुख व देवगिरी प्रदेश उपाध्यक्ष गिरीश कुलकर्णी तसेच तंत्र शिक्षण विद्यार्थी
कार्य सह-संयोजक आर्यन भालशंकर हे मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रायसोनी
महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी उपस्थित मान्यवरांचे
स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देणाऱ्या अशा महत्त्वपूर्ण
उपक्रमाचे आयोजन रायसोनी इन्स्टिट्यूटला मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
‘डीपेक्स २०२६’ हा केवळ एक स्पर्धात्मक उपक्रम नसून तो कल्पना, सर्जनशीलता आणि इनोव्हेशनचा उत्सव असल्याचे त्यांनी
स्पष्ट केले. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी आयोजित
करण्यात आलेली ही प्रादेशिक फेरी विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना दिशा
देणारा आणि त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एक महत्त्वाचा मंच ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच ‘विकसित
भारत २०४७’ या संकल्पनेचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, भारताचा विकास हा तरुणांच्या सर्जनशीलतेवर, धैर्यावर आणि इनोव्हेशन दृष्टिकोनावर आधारित असेल. ‘डिपेक्स’च्या
माध्यमातून भविष्यातील स्टार्टअप्स,
संशोधन प्रकल्प, पेटंट्स आणि समाजोपयोगी उपायांची पायाभरणी होत असून, आज इथे सादर होणाऱ्या कल्पनाच उद्याचे परिवर्तन घडवतील, असा आशावाद
व्यक्त करत त्या म्हणाल्या की,
आज सुरू असलेली
इनोव्हेशनची क्रांती ही तुमच्यापासूनच सुरू होत आहे. तुमच्या तरुण, सर्जनशील आणि प्रयोगशील विचारांकडून समाजाला आणि देशाला
मोठ्या अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पनांमधूनच उद्याचे संशोधन, तंत्रज्ञान आणि उद्योग आकार घेणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, स्वायत्त महाविद्यालय म्हणून रायसोनी महाविद्यालयात केवळ
पारंपरिक शिक्षणावर न थांबता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने उद्योगाभिमुख, नवतंत्रज्ञानाधारित
आणि कौशल्यकेंद्रित शिक्षण देण्यावर विशेष भर दिला जात असल्याचेही त्यांनी नमूद
केले. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व्यासपीठ
द्यावे, संशोधनाची सवय लावावी आणि आत्मविश्वासाने
नव्या प्रयोगांकडे वाटचाल करावी,
असे आवाहनही त्यांनी केले.
यानंतर प्रमुख पाहुणे श्री. भरत अमळकर यांनी उपस्थित
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, ‘डीपेक्स’ सारखा इनोव्हेशनला चालना
देणारा उपक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांनी रायसोनी महाविद्यालयाचे विशेष
कौतुक केले. “विद्यार्थ्यांमधील कल्पकता,
संशोधनवृत्ती आणि सामाजिक
भान जागृत करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत,” असे ते म्हणाले.
‘डीपेक्स’ उपक्रमाशी आपली दीर्घकालीन नाळ जोडलेली
असल्याचे सांगत ते म्हणाले,
“मी या उपक्रमाचा
सुरुवातीपासून आयोजक सदस्य आहे. ‘डीपेक्स’चा उद्देश केवळ स्पर्धा घेणे नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण करणे आणि त्या
प्रश्नांची उत्तरे शोधण्याची सवय लावणे हा आहे.”
विद्यार्थ्यांनी समाजातील विविध समस्यांकडे डोळसपणे
पाहावे, निरीक्षण करावे आणि प्रश्न विचारावेत, असे आवाहन करत त्यांनी सांगितले की, “प्रश्न पडणे ही कमजोरी नसून संशोधकाची सर्वात मोठी ताकद
आहे. क्रिएटिव्ह माइंड ठेवून प्रश्नांवर उपाय शोधण्याची प्रक्रिया म्हणजेच खरे
संशोधन होय.” ‘डीपेक्स’मधूनच भविष्यातील स्टार्टअप्स, संशोधन प्रकल्प आणि समाजपरिवर्तनाची बीजे रोवली जातात, असेही त्यांनी नमूद केले.
स्पेक्ट्रम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र वाघ
यांनी आपल्या मार्गदर्शनात आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नसून
नवकल्पना, कौशल्य आणि व्यावहारिक विचारसरणी आवश्यक
असल्याचे सांगितले. ‘डीपेक्स’सारखे उपक्रम विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे नेणारे
प्रभावी व्यासपीठ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे भुसावळ प्रमुख व देवगिरी
प्रदेश उपाध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, राष्ट्रहित आणि नवोन्मेषी दृष्टिकोन विकसित होणे गरजेचे
असल्याचे सांगितले. ‘डीपेक्स’ सारख्या उपक्रमातून नेतृत्वगुण आणि समाजोपयोगी
विचारसरणी घडते, असे त्यांनी नमूद केले.
या स्पर्धेसाठी सुमारे ८० ग्रुप व ३३१ विद्यार्थ्यानी
सहभाग नोंदविला. या स्पर्धेची राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा फेरी ५ ते ८ मार्च २०२६
रोजी एम आय टी कॉलेज छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न होणार आहे.
या उपक्रमाचे समन्वय अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. बिपासा पात्रा आणि अभाविपचे अजित केंद्रे यांच्या
मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)
यांच्या टीमने तसेच स्टुडंट व्हॉलंटिअर्सनी प्रभावी समन्वय साधत संपूर्ण कार्यक्रम
उत्तमरीत्या हाताळला.
प्रत्येक विषयासाठी ३ औद्योगिक तज्ज्ञ व २ शैक्षणिक तज्ज्ञ अशा पाच सदस्यीय परीक्षक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. उपक्रम यशस्वी केल्याबद्दल रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी आयोजकांचे कौतुक केले.








Comments
Post a Comment