राज्यस्तरीय ‘आविष्कार’ अंतिम फेरीत कबचौ विद्यापीठाचा एकमेव विराज दुसाने उपविजेता
कबचौ विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत रायसोनीच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय झेप ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्याचा गौरव
जळगाव, ता. ५ : विद्यार्थ्यांच्या
संशोधन क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यपाल कार्यालयातर्फे आयोजित करण्यात
येणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेत जी. एच.
रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथील विद्यार्थ्याने उल्लेखनीय
यश संपादन करत राज्यस्तरीय अंतिम फेरीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे प्रतिनिधित्व करत हे यश
मिळवणारा आणि खानदेश विभागातून अंतिम फेरीत पोहोचणारा जी. एच. रायसोनी
महाविद्यालयाचा हा एकमेव विद्यार्थी ठरला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल रायसोनी महाविद्यालयाच्या
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात
आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करत सांगितले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून ‘आविष्कार’ स्पर्धेत सहभागी होत रायसोनी
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने राज्यस्तरावर यश मिळवणे ही अत्यंत अभिमानाची बाब
आहे. संशोधनवृत्ती, सातत्य आणि नाविन्यपूर्ण विचारसरणी हीच भविष्यातील
तंत्रशिक्षणाची खरी ताकद असून, विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या माध्यमातून समाजोपयोगी व शाश्वत
तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी मार्गदर्शन केले.
खानदेशातून एकमेव रायसोनी महाविद्यालयाचा विद्यार्थी राज्यस्तरीय ‘आविष्कार’च्या
अंतिम फेरीत द्वितीय ठरल्याचा विशेष आनंद त्यांनी व्यक्त केला.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठात दिनांक २८ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान १८ वी महाराष्ट्र राज्य
आंतरविद्यापीठीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत
राज्यातील विविध विद्यापीठांमधील संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या
संशोधन प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण केले.
या स्पर्धेत रायसोनी महाविद्यालयाच्या
सिव्हील अभियांत्रिकी (स्थापत्य) विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी विराज
नामदेव दुसाने याने ‘एच₂ नेक्सस नॅनो एन्हान्स्ड बायो हायड्रोजन प्रोडक्शन सिस्टीम’ या नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण करत एम.टेक (स्ट्रक्चर्स) कॅटेगरीतून राज्यात
द्वितीय क्रमांक मिळवला. त्याला प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून
गौरविण्यात आले.
‘आविष्कार’ ही विद्यार्थ्यांच्या संशोधन
व नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ देणारी महाराष्ट्रातील एक नामांकित स्पर्धा
असून, या स्पर्धेची पहिली फेरी कवयित्री
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे विद्यापीठस्तरावर पार पडली
होती. त्या फेरीतून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी
करण्यात आली होती. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विविध महाविद्यालयांतील
विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय फेरीत सहभाग घेतला होता; त्यापैकी द्वितीय क्रमांक पटकावणारा विराज
दुसाने हा एकमेव विद्यार्थी ठरला, ही बाब विशेष गौरवास्पद आहे.
या संशोधन कार्यासाठी विद्यार्थ्याला सिव्हील अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. शंतनू पवार तसेच सहाय्यक प्रा. डॉ. अक्षय गुप्ता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रायसोनी महाविद्यालय संशोधन, इनोव्हेशन आणि गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने उंच भरारी घेत असल्याचे हे यश अधोरेखित करत असून, खानदेशातील शैक्षणिक क्षेत्रासाठी ही कामगिरी अभिमानास्पद असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुकपूर्वक नमूद केले.


Comments
Post a Comment