‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन–२.०’ला दिमाखात प्रारंभ ; जी. एच. रायसोनीत नवसंशोधनाचा महोत्सव
१८ राज्यांतील ७० शहरांमधून २८४ संघांचा उत्स्फूर्त सहभाग; सलग ३० तासांच्या राष्ट्रीय हॅकाथॉनला भव्य उद्घाटनाने सुरुवात
जळगाव,
ता. २८ : जी. एच.
रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात
राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन–२.०’ या बहुप्रतिक्षित तांत्रिक
स्पर्धेचा आज उत्साहात शुभारंभ झाला. देशभरातील १८ राज्यांतील ७० शहरांमधून तब्बल
२८४ संघांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी कठोर परीक्षण प्रक्रियेनंतर निवडलेल्या
अव्वल ४० संघांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. ही स्पर्धा सलग ३० तासांची
ऑफलाईन कोडिंग मॅरेथॉन स्वरूपात पार पडत आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाला विनले पॉलिमर्स प्रा. लि. चे
संचालक श्री. प्रमोद संचेती तसेच गूगलमध्ये डेवऑप्स आणि क्लाऊड इंजिनिअर म्हणून
कार्यरत असलेल्या सलोनी सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जी.
एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, विभागप्रमुख व प्राध्यापकवर्ग उपस्थित
होते.
उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविक करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल यांनी उपस्थितांना संबोधित करत “गुड मॉर्निंग इनोव्हेटर्स, चेंजमेकर्स आणि कोडिंग वॉरियर्स!” अशा
उत्साहपूर्ण शब्दांत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, “आज आपला संपूर्ण कॅम्पस ऊर्जेने भारलेला
आहे. देशातील १८ राज्यांतील ७० शहरांमधून आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी येथे
एकत्र येत इनोव्हेशनचा भव्य संगम घडवला आहे. कठोर मूल्यमापनानंतर अव्वल ४० संघांना
अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले असून ते आज ३० तासांच्या नॉन-स्टॉप कोडिंग
मॅरेथॉनसाठी सज्ज झाले आहेत. ही केवळ स्पर्धा नसून कल्पनांना वास्तवात उतरवण्याची
आणि स्वतःची क्षमता ओळखण्याची सुवर्णसंधी आहे.” तसेच त्यांनी विद्यार्थी समन्वयक व
स्वयंसेवकांच्या परिश्रमांचे कौतुक करत सर्व सहभागी संघांना “पुश बाउंडरीज, चॅलेंज युवरसेल्व्ह्ज अँड लेट युवर
इमॅजिनेशन सोअर!”असा संदेश दिला.
प्रमुख पाहुणे श्री. प्रमोद संचेती यांनी आपल्या मनोगतात
उद्योगविश्वात नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित करत
विद्यार्थ्यांनी समस्यांकडे ‘सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच’ने पाहावे, असे आवाहन केले. तर सलोनी सिंग यांनी
क्लाऊड तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि स्केलेबल सोल्युशन्सच्या
माध्यमातून जागतिक स्तरावर संधी उपलब्ध असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना सातत्याने
कौशल्यविकास करण्याचा सल्ला दिला.
या स्पर्धेत ट्रॅव्हल अँड टुरिझम, हेल्थ केअर, सायबर सिक्युरिटी, फार्मा, गव्हर्नमेंट
सर्व्हिसेस आदी विविध क्षेत्रांशी संबंधित समस्या-विधाने देण्यात आली असून
विद्यार्थी त्यावर संशोधनाधारित नाविन्यपूर्ण उपाय सादर करत आहेत.
महाविद्यालयातर्फे स्पर्धेसाठी अत्याधुनिक संगणकीय सुविधा, उच्चगती इंटरनेट, सुसज्ज प्रयोगशाळा व तज्ज्ञ परीक्षकांची
व्यवस्था करण्यात आली आहे. विजेत्या संघांना आकर्षक पारितोषिके प्रदान करण्यात
येणार असून जळगाव शहर पुन्हा एकदा राष्ट्रीय नवसंशोधनाच्या केंद्रस्थानी आले आहे.
हा दोन दिवसीय तांत्रिक महोत्सव नवकल्पना, सर्जनशीलता आणि सहकार्याची नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी व्यक्त केला आहे.





.jpeg)
Comments
Post a Comment