जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘सदा-ग्यान सिरीज’ अंतर्गत पद्मश्री चैत्राम पवार यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न
‘सदा-ग्यान सिरीज’च्या पहिल्याच उपक्रमातून विद्यार्थ्यांना संघर्ष, कष्ट व समाजकार्याची प्रेरणा; सदाबाई–ग्यानचंद रायसोनी यांच्या प्रेरणेतून ‘सदा-ग्यान सिरीज’ संकल्पनेची उभारणी
जळगाव : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे ‘सदा- ग्यान सिरीज’ अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेतील पहिल्याच उपक्रमात पद्मश्री चैत्राम पवार यांच्या “सुजलाम सुफलाम : प्रेरणादायी वाटचाल” या विषयावरील व्याख्यानाने विद्यार्थ्यांना नवचैतन्य दिले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री चैत्रामजी पवार, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, बाळाभाऊ जोगी (वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र राज्य – व्यवस्था प्रमुख), उमेश दिनकर सोनवणे (जिल्हा महाविद्यालय प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), दीपक परदेशी (बहिणाबाई महोत्सव प्रमुख समन्वयक) आणि अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी ‘सदा-ग्यान सिरीज’ या अभिनव व्याख्यानमालेची भूमिका सविस्तरपणे मांडली. त्या म्हणाल्या, ‘सदा- ग्यान’ ही केवळ व्याख्यानमाला नसून, उच्च शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना एक उत्तम माणूस, सामाजिक भान असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून घडविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी किंवा कौशल्ये पुरेशी नसून माणुसकी, मूल्ये आणि समाजाबद्दलची जाणीव ही तितकीच महत्त्वाची आहे. “ज्ञानाला दिशा देते ती माणुसकी आणि यशाला गती देते ते सामाजिक भान. त्यामुळे ‘सदा-ग्यान सिरीज’ सारख्या उपक्रमांची आज सर्वच विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये नितांत आवश्यकता आहे. अशा उपक्रमांतून समाजासाठी काहीतरी देण्याची जाणीव असलेला नागरिक घडेल,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
‘सदा-ग्यान सिरीज’ या संकल्पनेमागील प्रेरणा सांगताना त्यांनी रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांचे आई-वडील सदाबाई व ग्यानचंद रायसोनी यांचा उल्लेख केला. “सदाबाई व ग्यानचंद रायसोनी यांची कष्टाळू वृत्ती, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि समाजाशी असलेली नाळ हीच ‘सदा-ग्यान’ या व्याख्यानमालेची प्रेरणा आहे. त्यांच्या विचारांमधूनच विद्यार्थ्यांना केवळ यशस्वी व्यावसायिक नव्हे तर जबाबदार नागरिक घडविण्याची ही संकल्पना साकार झाली आहे,” असे त्यांनी सांगितले.
जळगाव कॅम्पसमध्ये ‘सदा-ग्यान सिरीज’चा पहिला उपक्रम पद्मश्री चैत्राम पवार यांच्यासारख्या थोर समाजसुधारकाच्या व्याख्यानाने सुरू होत असल्याचा विशेष आनंद व्यक्त करत त्या म्हणाल्या, “शाश्वत विकास, समाजकार्य आणि मूल्याधिष्ठित जीवनाचा वस्तुपाठ विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनप्रवासातून मिळणार आहे. व्यवस्थापन व अभियांत्रिकी क्षेत्रातील आमचे विद्यार्थी हे गमक समजून घेऊन परिवार, ग्राम, समाज आणि पर्यायाने राष्ट्राच्या विकासासाठी योगदान देतील, हीच या उपक्रमामागची अपेक्षा आहे.”
यानंतर प्रमुख मार्गदर्शक पद्मश्री चैत्रामजी पवार यांनी “सुजलाम् सुफलाम् : प्रेरणादायी वाटचाल” या विषयावर अत्यंत प्रभावी व अनुभव संपन्न मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या साध्या, पण हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत बारीपाडा या गावाचा संघर्षमय ते आदर्श असा प्रवास उलगडून दाखवला.
ते म्हणाले, “आजच्या प्रथम पुष्पाचे ब्रीद ‘सुजलाम् सुफलाम्’ आहे आणि हे केवळ घोषवाक्य नसून आम्ही ते जगून दाखवले आहे.” बारीपाडा या दुर्गम भागातील गावाचे भवितव्य बदलविताना जंगल, जल, जन (लोक), जमीन आणि पशुधन या पंचसूत्रांच्या बळावर गावाचे ‘सोने’ कसे केले, याचा प्रेरणादायी आलेख त्यांनी मांडला. या संपूर्ण कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘वनवासी कल्याण आश्रम’ मधील पूर्णवेळ स्वयंसेवकांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
१९९० साली सुरू झालेली ही लोकचळवळ आजही अखंडपणे सुरू असून ती देशातील असंख्य गावांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. जंगल वाचविण्यासाठी सुरुवातीला वृक्षतोड पूर्णतः थांबवून तब्बल ११०० एकर क्षेत्रावर सुमारे ४३५ प्रकारच्या जवळपास ५,००० झाडांची लागवड करण्यात आली. यामुळे सरपणाचा प्रश्न निर्माण झाला, मात्र त्यावर मात करण्यासाठी सोलर कुकर, स्मोक-फ्री चूल यांसारख्या पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब करण्यात आला.
गावातील विस्थापनाचे मुख्य कारण असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून परिसरात ७०० हून अधिक बांध बांधण्यात आले. परिणामी पाण्याचा प्रश्न सुटला आणि जमिनीची पोत सुधारण्यासाठी परंपरागत शेतीकडे वळत ‘गो-आधारित आदर्श शेती’चा अवलंब करण्यात आला. पन्नासहून अधिक भारतीय पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन करून ‘शुद्ध अन्न’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली.
याच उपक्रमातून मागील २१ वर्षांपासून ‘वनभाजी महोत्सव’ सातत्याने आयोजित करण्यात येत असून, यंदाच्या महोत्सवात ६० गावांमधील २७ महिला सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवात तब्बल ११० प्रकारच्या वनभाज्या सादर करण्यात आल्या, ही बाब विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
आज गावालगत ११,२०० हेक्टर क्षेत्रावर वनक्षेत्र निर्माण झाले असून, वृक्षतोड केल्यास दंडाची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. बारीपाडा गावाने ‘अस्मिता आणि अस्तित्व’ जपत शाश्वत विकास साधला आहे. शासनाकडून कर्ज घेऊन गावात विविध उद्योग-धंदे सुरू करून ते कर्ज वेळेपूर्वी परत करणारे हे आदर्श गाव ठरले आहे. “शुद्ध भोजन, शुद्ध ऑक्सिजन आणि शांत झोप” ही विकासाची नवी व्याख्या बारीपाडा गावाने देशासमोर ठेवली असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की, “संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण हे संस्कार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. संसाधनांची कमतरता कधीच अपयशाचे कारण ठरत नाही; जिद्द, श्रम आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते.”
त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सामाजिक आणि जबाबदारीची जाणीव मिळाल्याचे सभागृहाच्या वातावरणातून स्पष्टपणे जाणवत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कल्याणी नेवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शंतनू पवार यांनी मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. ‘सदा-ग्यान सिरीज’ अंतर्गत झालेला हा पहिलाच उपक्रम अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)

Comments
Post a Comment