जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन”वर दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

अ‍ॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग व स्मार्ट सिटी संकल्पनेतील डिजिटल बदलांवर देश–विदेशातील तज्ञांचे मार्गदर्शन ; संशोधक, स्कॉलर व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, ता. २२ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालय येथे “डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन फॉर अ‍ॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट” या विषयावर दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर परिषद ई अँड टीसी, मेकॅनिकल, सिव्हिल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड ऑटोमेशन टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबो (श्रीलंका) यांच्या सहकार्याने पार पडली.

परिषदेची सुरुवात सकाळी नोंदणी व पाहुण्यांच्या आगमनाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संशोधन लेखनावर आधारित कॉन्फरन्स प्रोसीडिंग्स / स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी स्मरणिकेचे प्रतीकात्मक अनावरण करून परिषदेच्या शैक्षणिक व संशोधनात्मक योगदानावर प्रकाश टाकला.

परिषदेच्या प्रास्ताविकात जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी उपस्थित मान्यवर, तज्ञ वक्ते, संशोधक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी त्यानी नमूद केले की, आज आपण अशा टप्प्यावर उभे आहोत जिथे तंत्रज्ञान, उद्योग आणि शहरी विकास यांचा संगम भविष्यातील जगाचे स्वरूप ठरवत आहे. अ‍ॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट ही दोन क्षेत्रे डिजिटल परिवर्तनामुळे पूर्णतः नव्याने परिभाषित होत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, डेटा अ‍ॅनालिटिक्स, ऑटोमेशन यामुळे चौथी व पाचवी औद्योगिक क्रांती आकार घेत आहे. यामुळे उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम, अचूक आणि पर्यावरणपूरक बनत आहे. डेटा हा निर्णय प्रक्रियेचा केंद्रबिंदू ठरत असून, प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स, रिअल-टाइम ऑप्टिमायझेशन आणि कस्टमाइज्ड उत्पादन शक्य झाले आहे.

त्याचबरोबर शहरे ही केवळ राहण्याची ठिकाणे न राहता स्मार्ट, शाश्वत आणि लवचिक परिसंस्था बनत आहेत. डिजिटल पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, स्मार्ट ट्रान्सपोर्ट आणि नागरिक-केंद्रित सेवा यामुळे शहरी जीवनमान अधिक सुलभ होत आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट ही स्वतंत्र क्षेत्रे नसून ती परस्परपूरक असून एकमेकांच्या यशावर अवलंबून आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या परिवर्तनासोबत सायबर सुरक्षा, कौशल्य विकास, एथिकल एआय व सर्वसमावेशक तंत्रज्ञानाचा वापर ही आव्हानेही असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, कोणत्याही देशाच्या प्रगतीत विज्ञान व तंत्रज्ञानाचे मोलाचे योगदान असते, हे जगातील अनेक प्रगत राष्ट्रांच्या वाटचालीवरून स्पष्ट झाले आहे. त्याच धर्तीवर भारतानेही डिजिटल परिवर्तनाचा मार्ग स्वीकारत पायाभूत सुविधांचा विस्तार आणि लोकोपयोगी सेवा विकसित केल्या आहेत.

क्लाउड सेवा, ई-गव्हर्नन्स, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम झाले आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मुळे आर्थिक व्यवहारांमध्ये क्रांतिकारी बदल झाला असून भारत जागतिक स्तरावर डिजिटल पेमेंटमध्ये आघाडीवर आहे. आरोग्य व शिक्षण क्षेत्रात ई-संजीवनी (टेलीमेडिसिन), ई-हॉस्पिटल, ई-कोर्ट्स, डिजिलॉकर यांसारख्या उपक्रमांमुळे सेवा अधिक सुलभ व सुरक्षित झाल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केंद्रस्थानी ठेवूनच या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

परिषदेचे मुख्य अतिथी प्रा. डॉ. संतोष राणे (प्रमुख, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मुंबई) यांनी आपल्या सविस्तर मार्गदर्शनात डिजिटल ट्विनिंग, इंडस्ट्री 5.0, स्मार्ट फॅक्टरीज याविषयी सखोल माहिती दिली. उद्योग क्षेत्रात डिजिटल ट्विन तंत्रज्ञानामुळे उत्पादनाची आभासी चाचणी, खर्चात बचत आणि गुणवत्ता वाढवणे शक्य झाले आहे. भविष्यात मानव–यंत्र सहकार्य (ह्युमन–मशीन कोलॅबोरेशन) हे उद्योगाचे केंद्रबिंदू ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

तसेच डॉ. संजय थिलकरथ्ने (युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबो, श्रीलंका) यांनी ऊर्जा सुरक्षा, नवीकरणीय ऊर्जा व डिजिटल तंत्रज्ञान यावरील जागतिक अनुभव मांडले.

परिषदेदरम्यान सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ई अँड टीसी, संगणक अभियांत्रिकी, डेटा सायन्स व व्यवस्थापन शाखांमध्ये समांतर तांत्रिक सत्रे घेण्यात आली. देश–विदेशातील संशोधकांनी आपल्या संशोधन पेपर्सचे सादरीकरण केले.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बिपासा पात्रा यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मुकुंद पाटील (डीन, आर अँड डी) यांनी मानले. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. तुषार पाटील, प्रा. डॉ. मुकुंद पाटील, प्रा. डॉ. शंतनू पवार तसेच सर्व विभागप्रमुख व आयोजन समिती सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. या परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष मा. श्री. सुनीलजी रायसोनी यांनी आयोजक समितीचे विशेष कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण