जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या “एनएसएस” विभागातर्फे शिरसोली येथे सातदिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

“युथ फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या संकल्पनेअंतर्गत जलसंधारण, स्वच्छता, मतदार जनजागृती व सामाजिक प्रबोधनाचा जागर; संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे यशस्वी आयोजन

जळगाव, ता. २१  : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे “युथ फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विथ स्पेशल फोकस ऑन वॉटरशेड मॅनेजमेंट अँड वेस्टलँड डेव्हलपमेंट” या राष्ट्रीय स्तरावरील संकल्पनेवर आधारित सातदिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक ७ जानेवारी ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत सौ. हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय, शिरसोली (प्र. ब.) येथे करण्यात आले.

शिबिराच्या पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी श्री. जगतराव पाटील, अध्यक्ष – जिजामाता विद्याप्रसारक मंडळ, शिरसोली (प्र. ब.), श्री. रविकिरण सवाळे (एकलव्य, स्वयंप्रेरणा व विकास केंद्र) तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. उद्घाटनप्रसंगी एनएसएसच्या माध्यमातून युवकांनी शाश्वत विकासासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.

शिबिराच्या पहिल्या दिवशी “विकसित भारत @2047” या विषयावर जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे  अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांचे मार्गदर्शन झाले, तर डॉ. योगिता पाटील यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण रॅली काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याच दिवशी डॉ. रुपाली दीक्षित (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव) यांनी तणाव व्यवस्थापन, डॉ. मनीषा वानखेडे यांनी एचआयव्ही जनजागृती, तर श्री. रविकिरण साबळे यांनी आत्मविश्वास विकास या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याचबरोबर एनएसएस स्वयंसेवक काशिश व त्यांच्या टीमने शाळेत भित्तीचित्र (वॉल पेंटिंग) उपक्रम राबविला.

तिसऱ्या दिवशी शिरसोली गावात स्वच्छता रॅली, मतदार जनजागृती व मतदार शपथ घेण्यात आली. जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे  प्रा. डॉ. मुकुंद पाटील यांनी कौशल्य विकास, तर प्रा. डॉ. तुषार पाटील यांनी मतदार जागृती विषयावर सत्र घेतले. क्रीडा उपक्रमांतर्गत योगा व लगोरी (सेव्हन स्टोन्स) खेळाचे आयोजन करण्यात आले. दिवसाची सांगता वंदे मातरम् घोषाने झाली.

चौथ्या दिवशी जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे  प्रा. वसीम पटेल यांनी (व्यक्तिमत्त्व विकास), श्री. मदन लाठी (गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव) यांनी प्लास्टिक फ्री इंडिया, तसेच श्री. विक्रम आसवार यांनी रस्ता सुरक्षा जनजागृती या विषयांवर मार्गदर्शन केले. याच कालावधीत स्वयंसेवकांनी जलसंधारण संरचना (वॉटरशेड) तयार केली तसेच गावात मतदार जनजागृती मोहीम राबवली.

या शिबिरास डॉ. राजू गवारे, जिल्हा एनएसएस अधिकारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी भेट देऊन स्वयंसेवकांना आगामी एनएसएस उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. डॉ. अंजली बोंदर (प्राध्यापक, मणियार लॉ कॉलेज, जळगाव) यांनी राष्ट्रीय बांधणी व पर्यावरण संरक्षणात युवकांची भूमिका या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. स्वयंसेवकांनी गौशाळा स्वच्छता उपक्रमही राबविला.

सहाव्या दिवशी आदित्य सवाळे (बी.टेक अ‍ॅग्री., प्रशिक्षक – जिल्हा वन कार्यालय, जळगाव) यांनी जलसंधारणाचे महत्त्व या विषयावर सत्र घेतले. याच दिवशी शिबिरात स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.

शिबिराचा समारोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “एनएसएस कॅम्प हे केवळ उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीचे प्रभावी माध्यम आहे. टीमवर्क, सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, संवेदनशीलता व शाश्वत विकासाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे कार्य अशा शिबिरांमुळे घडते. युवकांनी समाजातील समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यावर उपाय शोधण्याची सवय लावावी.” त्यांनी सर्व स्वयंसेवकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद करत भविष्यातही अशाच उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

संपूर्ण शिबिर यशस्वी होण्यासाठी समन्वयक म्हणून प्रा. अमोल जोशी व प्रा. योगेश वंजारी यांनी प्रभावी नियोजन व उत्कृष्ट समन्वय साधला. एनएसएस कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, शाळेचे प्रशासन तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. सात दिवस चाललेल्या या विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व तसेच राष्ट्रनिर्मितीबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित झाला. या यशस्वी आयोजनाबद्दल रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, स्वयंसेवक व आयोजकांचे विशेष कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण