जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “बिझनेस मेला” व “पतंग महोत्सव” ; दुहेरी उपक्रम
कॅम्पस स्टार्टअप्सना व्यासपीठ तर पतंगावर सकारात्मक संदेशातून समाजप्रबोधन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित “बिझनेस मेला”
अंतर्गत कॅम्पस बाजार भरविण्यात आला होता. या मेळाव्यात एमबीए विभागातील
विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप प्रोजेक्ट्सचे सादरीकरण करणारे एकूण ४० विविध स्टॉल
लावण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून कॅम्पस मधील विद्यार्थ्यांच्या
स्टार्टअप्सना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
या स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांनी
महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः विकसित केलेल्या
उत्पादनांचे प्रदर्शन मांडले होते. यामध्ये खाऊचे स्टॉल, जेवणाचे पदार्थ, सॅंडविच, नव्या पद्धतीची सरबते, ग्रिटिंग्ज, पुस्तके, आयटी सेवा, लाकडापासून तयार केलेल्या कलाकृती, बेकरी प्रोडक्ट्स तसेच विविध
प्रकारचे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स यांचा समावेश होता. महाविद्यालयीन
विद्यार्थी-विद्यार्थिनींसह प्राध्यापक व पालकांनी या कॅम्पस बाजाराला भेट देत
विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप उपक्रमांचे कौतुक केले. प्रत्येक पाहुण्याचे स्वागत
गुलाबाचे फूल देऊन करण्यात आले.
याच वेळी मकरसंक्रांतीनिमित्त
आयोजित “पतंग महोत्सवात” विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत पतंगावर
विविध सकारात्मक,
सामाजिक व प्रेरणादायी संदेश लिहून
समाजप्रबोधन केले. ‘सेव्ह गर्ल चाईल्ड’,
‘मतदान करा, ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, लोकशाही मजबूत करा’ अशा आशयपूर्ण
स्लोगन्समुळे या उपक्रमाला सामाजिक जाणीवेची जोड मिळाली.
या संयुक्त उपक्रमांचे उद्घाटन
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अकॅडेमिक
डीन प्रा. डॉ. संजय शेखावत,
विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास मार्गदर्शन करताना जी. एच. रायसोनी
इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात
विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता नवकल्पना, सर्जनशीलता व उद्योजकतेकडे वळणे
अत्यंत आवश्यक आहे. महाविद्यालयीन जीवनातच स्टार्टअप संकल्पनांना योग्य व्यासपीठ, मार्गदर्शन व संधी मिळाल्यास
त्यातून यशस्वी उद्योजक घडू शकतात. “बिझनेस मेला”सारख्या उपक्रमांमुळे
विद्यार्थ्यांना स्वतः विकसित केलेल्या उत्पादनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो
तसेच बाजारपेठेची गरज,
ग्राहकांची अपेक्षा आणि उत्पादनाचे
महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजते.
त्यानी पुढे नमूद केले की, प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली
तयार झालेली उत्पादने ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व नवकल्पनांचे प्रतीक असून
अशा उपक्रमांमुळे संशोधन,
इनोव्हेशन व स्टार्टअप संस्कृतीला
चालना मिळते. विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरू नये, सातत्य ठेवावे
आणि आपल्या कल्पनांवर विश्वास ठेवावा,
कारण आजची तरुणाई ही उद्याच्या
भारताची उद्योजक शक्ती आहे.
तसेच “पतंग महोत्सव”सारख्या
सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट करताना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी
सांगितले की, अशा उपक्रमांमुळे
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव,
सकारात्मक विचारसरणी व भारतीय
संस्कृतीचे संवर्धन होते. जीवनात यश,
प्रतिष्ठा व उंची मिळवताना
पतंगासारखी उंच भरारी घ्यावी;
मात्र पाय जमिनीवर घट्ट ठेवत
मूल्यांची जपणूक करणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली असल्याचा प्रेरणादायी संदेश
त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी
आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की,
स्टार्टअप प्रोजेक्ट्सचे प्रत्यक्ष
सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला तसेच उत्पादन
सादरीकरण, ग्राहक प्रतिसाद व नवकल्पनांबाबत
मौल्यवान अनुभव मिळाला.
या संपूर्ण उपक्रमाचे समन्वय एमबीए
विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील,
एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी
नेवे तसेच प्रा. श्रेया कोगटा व प्रा. सुरेखा वाणी यांनी साधला. या उपक्रमाचे
यशस्वी आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी
यांनी सर्वांचे कौतुक केले.


.jpg)
Comments
Post a Comment