जी. एच. रायसोनी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त “राष्ट्रीय युवा दिन” साजरा

विकसित भारत @2047 – व्हॉईस ऑफ युथ” विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

जळगाव, ता. १२ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, (ऑटोनॉमस) येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन स्टुडंट कौन्सिल व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा सखोल संदर्भ देत युवकांची राष्ट्र उभारणीत असलेली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी नमूद केले की, “स्वामी विवेकानंद यांनी युवकांना केवळ आत्मविश्वास दिला नाही, तर राष्ट्रनिर्मितीची दिशा दिली. आजचा युवक हा केवळ उद्याचा नागरिक नाही, तर आजच देशाचा कणा आहे.”

फक्त भारत स्वतंत्र झाला, एवढ्यावर समाधान मानण्याची वेळ आता संपली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या या शंभर वर्षांत भारताने तंत्रज्ञान, विज्ञान, अर्थव्यवस्था आणि सामाजिक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे, असे अभिमानाने म्हणता येईल इतपत युवकांनी काम केले पाहिजे. शंभर वर्षांनंतर आपण असे म्हणू शकलो पाहिजे की भारत केवळ स्वतंत्र नाही, तर सशक्त, आत्मनिर्भर, विकसित आणि आर्थिक महासत्ता बनलेला देश आहे.”

प्रा. डॉ. अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना स्ट्रॉंग माईंडसेट ठेवण्याचा सल्ला देत सांगितले की, आव्हानांपासून पळ न काढता त्यांना सामोरे जाणे, अपयशातून शिकणे आणि सातत्याने स्वतःची प्रगती करणे हीच खरी युवकांची ओळख आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याचे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अ‍ॅप्रोच विकसित करण्याचे तसेच उद्देशपूर्ण इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून समाज व राष्ट्र प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

आज भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. डिजिटल क्रांती, स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनच्या माध्यमातून युवकांनी भारताला जागतिक स्तरावर सक्षम बनवावे, असे सांगत त्यांनी युवकांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिष्ठा विकसित होण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी “विकसित भारत @2047 – व्हॉईस ऑफ युथ” या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून राष्ट्रप्रती असलेली जबाबदारी प्रभावीपणे मांडली. विद्यार्थ्यांनी सांगितले की, भारत हा जगातील सर्वात युवा देश असून ही युवा शक्ती योग्य दिशेने कार्यरत झाली, तर देशात मोठी क्रांती घडू शकते.

विद्यार्थ्यांनी स्ट्रॉंग माईंड, सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि नेतृत्वगुण हे विकसित भारताच्या उभारणीसाठी अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. शिक्षण, कौशल्य विकास, तंत्रज्ञान, इनोव्हेशन, स्टार्टअप संस्कृती, आत्मनिर्भरता आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रांत युवकांची भूमिका निर्णायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, सामाजिक समतेचा आग्रह, डिजिटल साक्षरता, ग्रामीण व शहरी विकासातील संतुलन आणि जबाबदार नागरिकत्व यावरही आपले विचार मांडले. “विकसित भारत हा केवळ सरकारचा प्रकल्प नसून, तो प्रत्येक युवकाच्या योगदानातूनच साकार होईल,” असा ठाम विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण, आशयघन आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणीमुळे वक्तृत्व स्पर्धा प्रभावी ठरली. या उपक्रमामुळे राष्ट्रीय युवा दिनाचा उद्देश सफल झाला.

या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व प्रा. डॉ. हर्षल कोतवाल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया भंगाळे व निधी वाजपेयी या विद्यार्थिनींनी केले. तसेच यशस्वी आयोजनासाठी डीन, स्टुडंट अ‍ॅक्टिव्हिटी प्रा. वसीम पटेल तसेच स्टुडंट कौन्सिलचे भाग्येश चौधरी (ए.आय.एम.एल., तृतीय वर्ष), प्रथमेश ए. गोसावी (सिव्हिल, तृतीय वर्ष), नकुल महाजन (ई.ई., तृतीय वर्ष), श्रेयश पी. शेजवळ (ए.आय., तृतीय वर्ष), राहुल सुरवाडे (मेकॅनिकल, तृतीय वर्ष) व सायली एम. भावसार (आय.टी., द्वितीय वर्ष) तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट समन्वय साधत मोलाचे योगदान दिले.

संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल जी. एच. रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी समन्वयक, मार्गदर्शक, परीक्षक व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

वक्तृत्व स्पर्धेचा निकाल

प्रथम क्रमांक : साक्षी सुनील कासार
(बी.टेक. ई.अँड.टी.सी.- द्वितीय वर्ष)

द्वितीय क्रमांक : सुमित दिपक खैरे
(बी.टेक. मेकॅनिकल- प्रथम वर्ष)

तृतीय क्रमांक : मोहित अशोक बडगुजर
(बी.टेक. इलेक्ट्रिकल – द्वितीय वर्ष)

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “अभियांत्रिकी अंतिम वर्ष प्रकल्पांचे” संशोधनात्मक सादरीकरण