युवारंग युवक महोत्सवात कला, संगीत, अभिनयाचा जल्लोष! 🎭🎶
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व रायसोनी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवास उत्साही सुरुवात
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाचे आज जल्लोषात उदघाटन झाल्यानंतर दुपारच्या सत्रात रायसोनी महाविद्यालयाचा परिसर संगीतमय वातावरणाने गजबजलेला दिसून आला.
रंगमंच क्र. १ बकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात नक्कल हा कलाप्रकार सादर करीत असताना प्रत्येक स्पर्धक आपल्या बाजूने कला सादर करताना दिसून येत होता. राजकीय नेते, चित्रपट अभिनेता, पक्षी, विविध कार्टून, पुष्पा चित्रपटातील नायक, संगीत वाद्य, नामवंत गायकांचे आवाज, विमान उड्डाण तसेच अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, निळू फुले, इंदोरीकर महाराज आदींची नक्कल हुबेहुब सादर करीत असताना प्रेक्षक विद्यार्थ्यांमधून दाद मिळवत होते. एकुण २३ महाविद्यालयाच्या संघांनी यात सहभाग नोंदविला होता. याच रंगमंचावर दुपारच्या सत्रात मुक अभिनय ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात भ्रमणध्वनीचा अतिरेक विषयी जनजागृती, अॅसिड अटॅक, कृत्रिम बुध्दीमत्तेचा मानवतेवर होणारा परिणाम तसेच पालकांना मुलांकडून काय हवयं आदी विषयावर २९ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदविला.
रंगमंच क्रमांक २ स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे भारतीय समुहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कलाप्रकारात एकुण २१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यात सारे जहाँ से अच्छा, हे माय भू तुझे मी, गार डोंगराची हवा, रडू नको बाळा, आकाशी झेप घेरे पाखरा, हा देश माझा याचे भान, इतनी शक्ती हमें देना दाता, खंडोबाची कारभारीन, तेरी लाल पिली अखिया, जय भारता जय भारता, छन छन बाजे पायलिया यासह अनेक समुहगान सादर करीत विद्यार्थ्यांनी दाद मिळवली, आपल्या गाण्याच्या बोलीनुसार विद्यार्थ्यांनी केलेले पेहराव लक्ष्य वेधून घेत होते.
रंगमंच क्रमांक ३ कवी प्रदीप सभागृह येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तीचे व्यापक संदर्भ हा विषय स्पर्धकांना देण्यात आला. एकुणच प्रत्येक सहभागी आपल्या बोलण्यातून देशभक्ती अंगात संचारत असताना दिसून आला. एकप्रकारे संपूर्ण रंगमंचावर देशमय वातावरण निर्मिती झालेली दिसून येत होती. काही प्रसंग इतके गंभीर होते की प्रेक्षक विद्यार्थ्यांच्या डोळयात अक्षरश: पाणी येताना दिसत होते. एकुण ८१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यात ०४ दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग होता
रंगमंच क्रमांक ४ कवी प्रेम धवन सभागृहात स्थळचित्र ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रायसोनी महाविद्यालय हा विषय स्थळचित्रासाठी देण्यात आला होता. ६० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या परिसरात ठिकठिकाणी विद्यार्थी आपले स्थळचित्र रेखाटतांना दिसून येत होते. याच रंगमंचावर दुपारी ४ वाजता व्यंगचित्र ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रस्त्यावरील विक्रेता, राजकीय पात्र व पौराणिक पात्र हे तीन विषय यावेळी देण्यात आला होता. अतिशय सुरेख पध्दतीने प्रत्येक स्पर्धक आपल्या कुंचल्यांनी दिलेल्या विषयावर चित्र काढताना दिसून येत होते. एकुण ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला यात ०४ विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी सहभागी होते.
रंगमंच क्रमांक ५ राष्ट्र संत तुकडोजी महाराज सभागृह येथे भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (स्वर वाद्य) ही स्पर्धा होती एकुण १२ विद्यार्थ्यांचा संघ यात सहभागी होता. बासरी, हार्मोनियम, विणा आदी वाद्यांची साथ-संगत घेत अतिशय उत्साहाने आपले सादरीकरण विद्यार्थी करताना दिसून येत होते. याच रंगमंचावर दुपारच्या सत्रात भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (ताल वाद्य) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात एकुण १५ विद्यार्थ्यांचा संघ आपली कला सादर करताना दिसून आले. तबला, पखवाज, ढोलकी, मृदुंग तसेच अत्याधुनिक वाद्य या प्रकारात वाजताना दिसून आले.
महोत्सवातील उद्या होणारे कार्यक्रम
रंगमंच क्र. १ बकिमचंद्र चटोपाध्याय सभागृह – प्रहसन - सकाळी ८.३० ते ११.३०
भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद - दु. १.०० ते ४.००
एकांकिका - सायंकाळी ४.०० ते ६.३०
रंगमंच क्रमांक २ स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह – पाश्चिमात्य समुहगान - सकाळी ८.३० ते ११.३०
रंगमंच क्रमांक ३ कवी प्रदीप सभागृह - वादविवाद - सकाळी ८.३० ते ११.३०
रंगमंच क्रमांक ४ कवी प्रेम धवन सभागृह – चिकट कला - सकाळी ८.३० ते ११.३०
माती कला - दु. १.०० ते ४.००
स्थळ छायाचित्रण (प्राथमिक फेरी) – सायं. ४.०० ते ६.३०
रंगमंच क्रमांक ५ राष्ट्र संत तुकडोजी महाराज सभागृह – भारतीय शास्त्रीय गायन एकल - सकाळी ८.३० ते ११.३०
पाश्चिमात्य गायन एकल- दु. १.०० ते ४.००
पाश्चिमात्य वाद्यसंगीत-एकल -सायंकाळी ४.०० ते ६.३०



Comments
Post a Comment