युवारंग २०२५: "आनंदमठ" नाट्यप्रयोगाने सुरुवात विद्यार्थ्यांच्या नोंदणीसह महोत्सवाला उत्साही प्रारंभ

कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी व जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा.डाॅ. प्रीती अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली रायसोनी महाविद्यालय सज्ज

जळगाव, ८ ऑक्टोबर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा रौप्य ‘युवारंग २०२५’ युवक महोत्सव जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (स्वायत्त) यांच्या प्रांगणात संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात सुरू झाला. त्यांच्या नियोजनशीर नेतृत्वामुळे २५ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला साजेशी भव्य तयारी करण्यात आली आहे.
यंदाच्या युवारंगमध्ये विद्यापीठांतर्गत ११५ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, १४९५ विद्यार्थी व व्यवस्थापकांचा सहभाग आहे. त्यामध्ये ५१३ विद्यार्थी, ८११ विद्यार्थिनी कलावंत, तसेच १४३ पुरुष व १११ महिला व्यवस्थापक सहभागी आहेत.
महोत्सवाच्या पूर्वसंध्येला, ‘वंदे मातरम् – १५०’ या संकल्पनेवर आधारित “आनंदमठ” या मराठी संगीत नाटकाचा भव्य प्रयोग सायंकाळी ७ वाजता रंगमंच क्र. १ – बंकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात सादर करण्यात आला.
विनिता तेलंग लिखित आणि रवींद्र सातपुते दिग्दर्शित या नाटकाने उपस्थित प्रेक्षकांना राष्ट्रभक्ती, संस्कृती आणि कलेचा भावनिक स्पर्श दिला.
या प्रसंगी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी या नाट्यप्रयोगाचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेली दिशा आणि संधी याबद्दल समाधान व्यक्त केले.
९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता उद्घाटन समारंभ होणार असून, राज्याचे जलसंपदा मंत्री मा. गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी असतील.
प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन, उद्योजक महेंद्र रायसोनी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, युवारंग समन्वयक प्रा. डॉ. संजय शेखावत व अन्य मान्यवर उपस्थित राहतील.
युवारंगसाठी ५ भव्य रंगमंच तयार करण्यात आले असून, २७ विविध कलाप्रकारांतील स्पर्धा ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहेत. यंदा एकांकिका स्पर्धा प्रथमच युवारंगमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभिनय कौशल्याला अधिक व्यापक व्यासपीठ मिळणार आहे.
१२ ऑक्टोबर रोजी समारोप आणि पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार असून, त्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी यावेळी सांगितले की, “हा रौप्यमहोत्सव विद्यार्थ्यांसाठी सृजनशीलतेचा आणि आत्मविश्वासाचा सर्वोत्तम अनुभव ठरेल; हे आयोजन आमच्या महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.”


Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश