जगाच्या विकासकार्यात अभियंत्यांचे मोठे योगदान : प्रा. डॉ. संजय शेखावत

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “अभियंता दिन” जल्लोषात साजरा ; ‘इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स’ विद्यार्थी शाखेचा शुभारंभ

जळगाव, ता. १५ : भारताचे प्रसिद्ध अभियंते व भारतरत्न “मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या” यांचा जन्मदिवस दरवर्षी अभियंता दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. त्यानुसार, दि. १५ सप्टेंबर रोजी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते तसेच मॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा.डॉ.मुकुंद पाटील, सिव्हील अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार, डेटा सायन्स-आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटील, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बिपासा पात्रा, व प्रा. डॉ. निलेश इंगळे यांचीही यावेळी उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे जगभरात सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत. या बदलांचा केंद्रबिंदू म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्र होय. अभियंत्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि नवनवीन शोधांमुळे देशाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळत आहे. अभियांत्रिकी आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भारत महासत्तेकडे वेगाने वाटचाल करत आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अभियंत्यांनी केलेले संशोधन, उद्योजकतेला चालना, तसेच स्टार्टअप संस्कृतीचा विकास हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे भारत हा तरुण देश आहे आणि आपल्या देशातील तरुण अभियंत्यांमध्ये प्रचंड क्षमता दडलेली आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना देणे, संशोधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाशी जोडणे ही आपली जबाबदारी आहे. विशेषतः ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ या उपक्रमांमुळे अभियंत्यांसाठी नवनवीन संधी निर्माण होत आहेत, "अभियांत्रिकी ही केवळ एक व्यावसायिक पदवी नाही, तर ती राष्ट्रनिर्मितीची एक मोठी प्रक्रिया आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, शेतीतील यांत्रिकीकरण, शहरी भागातील स्मार्ट सिटी प्रकल्प, वाहतुकीतील अत्याधुनिक साधने, डिजिटल पेमेंट प्रणाली — या सर्व क्षेत्रांमध्ये अभियंत्यांचा थेट व अप्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे अभियांत्रिकीच्या प्रत्येक शाखेचा अभ्यास करताना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे." असे प्रतिपादन संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मुकुंद पाटील यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक यशाची माहिती देत विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. त्यानंतर मार्गदर्शन सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले अॅकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील बदलांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “आयटी क्षेत्रातील वेगवान प्रगतीमुळे अभियांत्रिकी क्षेत्रात मोठा बदल घडत आहेत. अभियंत्यांमुळे आज भारत जागतिक स्तरावर ओळखला जात आहे. अभियांत्रिकीतील विषयांची संख्या वाढत आहे आणि गुणवत्ताप्रधान, पर्यावरणपूरक बदल हे काळाची गरज आहे. नॅनोटेक्नॉलॉजी आणि मेकॅट्रॉनिक्स हे भविष्यातील महत्त्वाचे विषय ठरणार आहेत. तसेच ऑटोमोबाईल उद्योगाचे महत्त्व वाढणार आहे. आयटीमुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील विकासाला गती मिळाली असून पुढील काळात मल्टिटास्किंग कौशल्यावर विशेष भर द्यावा लागणार आहे. आगामी काळात टिकाऊ विकास हा अभियांत्रिकीचा केंद्रबिंदू असावा. केवळ मोठ्या प्रकल्पांची उभारणी न करता, पर्यावरणाचा समतोल राखत तंत्रज्ञानाचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रीन टेक्नॉलॉजी, स्मार्ट मटेरियल्स, नवीकरणीय उर्जा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पुढील दशकातील महत्त्वाचे घटक ठरणार आहेत. या क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत व जागतिक पातळीवर भारताचे नाव उंचवावे," असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे समन्वय अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापकांनी उत्कृष्टरीत्या साधले तर यशस्वी आयोजनाबद्दल जी. एच. रायसोनी समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तंत्रज्ञान व संशोधनाला गती देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी नवा मंच

अभियंता दिनानिमित्त महाविद्यालयात “इस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स” या विद्यार्थ्यांच्या शाखेची औपचारिक स्थापना करण्यात आली. ही शाखा विशेषतः विद्युत अभियांत्रिकी विभाग तसेच संगणक विभागात सुरु करण्यात आली असून विद्यार्थ्यांना संशोधन, तांत्रिक कौशल्य विकास आणि नवोन्मेषासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या शाखेमुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक सक्षमीकरण, उद्योगाशी जोडलेले प्रशिक्षण, प्रकल्प सादरीकरण, कार्यशाळा व सेमिनार यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रगतीची ओळख होईल, ज्यामुळे त्यांच्या करिअरच्या संधी अधिक व्यापक होतील.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश