जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “माइंडफुलनेस स्पिरिचुअलिटी अँड टेक्नॉलॉजी”वर राष्ट्रीय परिषद संपन्न
भारतातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परिषदेत २९८ पेपर सादर ; तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयाने शांती नांदेल : मार्गदर्शकांचा सूर
या परिषदेचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका
प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, सध्याचं युग हे
आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे. आजच्या या डिजिटल युगात तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचा
प्रत्येक पैलू व्यापला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया
यामुळे माहितीचा महापूर लोकांपर्यंत पोहोचतो आहे. अशा वेगवान जीवनशैलीत मानसिक
स्वास्थ्य, एकाग्रता व आत्मिक शांती टिकवण्यासाठी माइंडफुलनेस आणि
अध्यात्माचे साधन अधिक आवश्यक असून उदाहरण द्यायचे झाल्यास एआय सारखे तंत्रज्ञान
आपल्याला डेटा अॅनालिसिस वापरून माणसांच्या मानसिक आरोग्याच्या गरजा समजून घेईल व AI-आधारित मेडिटेशन अॅप्स लोकांना माइंडफुलनेस शिकवेल. तंत्रज्ञान अध्यात्म व माइंडफुलनेस या
तिन्हींचा संगम करून आपण कामामध्ये सहजता आणू शकतो. त्यामुळे अशक्य वाटणाऱ्या
गोष्टी आता मानवाला अवगत झाल्या आहेत. एकूणच मानव समाजाच्या ज्ञानकक्षा प्रचंड
रुंदावल्या आहेत. या रुंदावलेल्या कक्षेत अध्यात्म नेमके कुठे बसते? विज्ञानाच्या कसोटीवर त्याचे परीक्षण आपल्याला करता येईल का ? अशा असंख्य प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी हि राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात
आली असून संशोधक व विध्यार्थ्यांना नक्कीच या परिषदेचा फायदा होणार आहे असे मत
त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर परिषदेतील प्रमुख वक्ते श्री. नयन शास्त्री
यांनी आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात नमूद केले कि, तंत्रज्ञानाचा
विवेकबुद्धीने वापर करून त्यात अध्यात्मिक मूल्ये व सजगता गुंफली, तर मानवी जीवन अधिक संतुलित, शांत आणि अर्थपूर्ण होईल. मुळात
तंत्रज्ञान म्हणजे फक्त यंत्र नव्हे तर जीवन समृद्ध करणारे साधन बनू शकते, आणि त्याला योग्य दिशा मिळते ती अध्यात्म व माइंडफुलनेसकडूनच तसेच आज
ध्यानासाठी मोबाइल अॅप्स,
श्वसनसाधनेसाठी डिजिटल रिमाइंडर्स, आभासी गुरुकुलं, ऑनलाइन थेरपी हे सर्व सहज उपलब्ध आहे. जगातील नामांकित
प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आपण घरबसल्या मिळवू शकतो. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या
माइंडफुलनेस ब्रेक्स किंवा डिजिटल डिटॉक्स डे राबवून कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य
जपण्याचा प्रयत्न करत आहेत. जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते त्यामुळे
तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य सांगड घालून मार्गक्रमण करा असे मत त्यांनी
यावेळी व्यक्त केले.
यानंतर कार्यक्रमातील दुसरे वक्ता प्रा. श्रीधर थोडा यांनी नमूद केले कि, तंत्रज्ञान प्रयोगातून विकसीत होते आध्यात्म योगातून प्राप्त होते, तंत्रज्ञानासाठी साधने वापरली जातात तर आध्यात्मासाठी साधना वापरली जाते असे
म्हणत त्यांनी तंत्रज्ञान नीति-निरपेक्ष आहे. ते ना नैतिक आहे, ना अनैतिक. तंत्रज्ञानात विनाशक व विकासक दोन्ही शक्ती आहे. म्हणून तंत्रज्ञान
सेवाही करू शकेल व संसारही. याचसाठी तंत्रज्ञानाला मूल्याची व अध्यात्माची
आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाला चुकीचे मार्गदर्शन मिळाले तर तंत्रज्ञान नरकाचा मार्ग
होऊ शकते व योग्य मार्गदर्शन मिळाले तर स्वर्गाचा मार्ग होऊ शकते. म्हणून
तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड हवी. तंत्रज्ञान जीवनाला रूप व गती देते तर, अध्यात्म जीवनाला शक्ती व दिशा देते. तंत्रज्ञान पाय आहेत तर अध्यात्म डोळे.
हे तंत्रज्ञानयुग आहे व म्हणून अध्यात्माची आज सर्वाधिक गरज आहे असे मत त्यांनी यावेळी
नमूद केले. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या सेमिनार हॉलमध्ये परिषदेतील उपस्थित
वक्त्यांनी आपल्या अतिशय उत्साहवर्धक मार्गदर्शनातून उपस्थितांना खिळवून ठेवले.
जळगाव व परिसरातील संशोधक,
नागरिक, प्राध्यापक ते महाविद्यालयीन विद्यार्थी
यांच्या गर्दीने सभागृह मोठ्यासंख्येने भरलेले होते. विविध राज्यांमधून जवळपास २९८
पेपरची निवड यावेळी करण्यात आली. या राष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन गोविंद मंधान
या विध्यार्थ्याने केले तर आभार अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी मानले
तसेच या परिषेदेचे समन्वय एमसीए विभागप्रमुख प्रा.कल्याणी नेवे यांच्या
मार्गदर्शनाखाली प्रा.रुपाली ढाके, प्रा. करिष्मा
चौधरी, प्रा.मानसी तळेले, प्रा.श्वेता चौधरी, प्रा.प्रतीक्षा
पाटील, प्रा.वासंती
इंगळे, प्रा.श्रुतिका सावळे, प्रा.नटवर झा., प्रा.मंगेश देवळे, प्रा. शुभम अडवाल, प्रा. राहुल
कंदरकर यांनी साधले तर सदर परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच.
रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment