जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षणाचे भविष्य” यावर विचारमंथन

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत तज्ञाचे सखोल मार्गदर्शन ; राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमात असंख्य विध्यार्थी व प्राध्यापकांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग

जळगाव ता. १७ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डाटा सायन्स तसेच इन्स्टिट्यूटशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने "आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशन फ्युचर ऑफ लर्निग" या शीर्षकाखाली एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे होते तर केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रा.डॉ. राम भावसार, मणिपाल विद्यापीठाचे सहयोगी प्रा.डॉ. प्रणीत सौरभ, इनटेक मासिकाचे संपादक डॉ.चारुदत्त पाठक व आग्रा येथील सेंट जॉन्स कॉलेजच्या प्रा.डॉ.मीनाक्षी चावला हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रारंभी स्व. श्री. ग्यानचंदजी व सदाबाई रायसोनी यांच्या प्रतिमेला पूजन करून या एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यासोबत अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील व डॉ. निलेश इंगळे हे उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय समन्वयक प्रा.तुषार वाघ यांनी करून दिला.

या एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवाद आयोजनामागचा हेतू व उद्देश आपल्या प्रास्ताविकेतून नमूद करतांना अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी म्हटले कि, गुणवत्ता व कौशल्यधारित योग्य शिक्षण ही काळाची गरज असून या कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थित तज्ञाचे सखोल मार्गदर्शन विध्यार्थी व प्राध्यापकांना नक्कीच उपयोगी पडणार आहे. तसेच जागतिक स्तरावरील समस्या सोडवायच्या असतील तर आपण कात टाकली पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापराचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन फायदे अनेक आहेत. परंतु, शिक्षक या नात्याने शिक्षणाच्या मूळ उद्देशाबाबतचा विचार केंद्रस्थानी ठेवावा लागेल. शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला गेला, तर अध्यापन आणि ज्ञानार्जनात व्यापक बदल होऊ शकतो. आपण सर्वजण एका साचेबद्ध व्यवस्थेतून बाहेर पडू आणि व्यक्तिकेंद्रित शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करू शकू. यात विद्यार्थ्यांची गरज आणि त्यांच्या आवडीचा प्रामुख्याने विचार केला जाईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यानंतर परिसंवाद कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.डॉ. राम भावसार यांनी नमूद केले कि, शिक्षकांना अध्यापनासाठी सातत्याने नवनवीन मार्ग शिकणे आणि आत्मसात करणे गरजेचे आहे. विशेषतः शिक्षणात, अध्यापनात एआय तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने शिकवण्याच्या तंत्रात कायापालट होऊ शकेल. त्याचवेळी शिकण्याची शैलीही बदलेल. एआयच्या शिक्षणातून अध्यापनाची प्रक्रिया खूपच सुलभ आणि रंजक राहू शकते. एआय तंत्रज्ञान हे शिक्षण व्यवस्था, व्यवस्थापन, तपासणी आदी कामांत साह्यभूत ठरू शकते. यानंतर प्रा.डॉ. प्रणीत सौरभ यांनी म्हटले कि कृत्रिम बुद्धिमत्ता हे संगणक विज्ञानातील एक उदयोन्मुख क्षेत्र आहे जे मानवी बुद्धिमत्तेची जवळून नक्कल करणारे बुद्धिमान संगणक सॉफ्टवेअर तयार करण्यास सक्षम आहे. एआय सह आपण मोठ्या प्रमाणावर डेटावर प्रक्रिया आणि विश्लेषण करू शकतो आणि ते अनुभवातून शिकू शकतो आणि सामान्यतः मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेली कार्ये करू शकतो. यामुळे अभूतपूर्व शक्यता आणि आव्हानांची दारे खुली झाली आहेत. त्यातून उत्पादकता वाढवणार आहे, शिक्षणसेवा सुधारणार आहे आणि विध्यार्थ्यांचा प्रवेश वाढणार आहे. तसेच गोपनीयता, मानवी हक्क आणि नोकऱ्यांचं नुकसान यावर गंभीर नैतिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली. यानंतर डॉ.चारुदत्त पाठक यांनी नमूद केले कि, एआय हे तीन मार्गानी विद्यार्थ्यांना एक गुणवान विद्यार्थी करू शकते. पहिले म्हणजे एआय निर्देशित शिक्षण. यात एआय निर्देशित मशिनमध्ये एखाद्या शिक्षकाला असणाऱ्या माहितीचा डेटा सामील केला जाईल. त्यानंतर ही मशिन एखाद्या शिक्षकाप्रमाणे विद्यार्थ्यांना संपूर्णपणे माहिती सादर करेल. एआय संचलित शिक्षणात एआय उपकरण हे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि शिक्षणाचा मार्ग निश्चित करण्यासाठी मार्गदर्शन करू शकते. हे मशिन वर्गाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना ट्यूटर म्हणूनही मदत करेल असे त्यांनी सांगितले यानंतर आपल्या मनोगतात बोलताना प्रा.डॉ.मीनाक्षी चावला यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या क्षेत्रात होत असलेल्या विकासावर प्रकाश टाकला. खास करून संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ही टेक्नॉलॉजी किती महत्त्वाची आहे संशोधनाच्या दृष्टीकोनातून आणि वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याचा वापर किती मोठ्या प्रमाणात केला जातो याबद्दल त्यांनी विवेचन केले. त्यासाठी सर्वांनी एआय तंत्र समजून घेणे गरजेचे आहे आणि त्याची तत्वे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात अवलंबली पाहिजेत जेणेकरून आपण विविध प्रकारचे संशोधन करू शकतो तसेच या तंत्रज्ञानाचा उपयोग भविष्यकालीन संशोधनात मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो याबद्दलही त्यांनी आपले मत व्यक्त केले.

या एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या आयोजनाप्रसंगी संयोजन समितीचे सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या परिसंवादाचा लाभ विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विध्यार्थ्यानी घेतला तसेच या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया टेकवानी यांनी केले तर आभार प्रा. प्रियांशी बोरसे यांनी मानले व या परिसंवाद  कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश