जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “माइंडफुलनेस स्पिरिचुअलिटी अँड टेक्नॉलॉजी”वर राष्ट्रीय परिषद संपन्न

संशोधक, स्कॉलर विध्यार्थी व प्राध्यापकांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग; भारतातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परिषदेत ९८ पेपर सादर

जळगाव, ता.२४ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. २३ रोजी “माइंडफुलनेस स्पिरिचुअलिटी अँड टेक्नॉलॉजी” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मुंबईतील व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयातील माजी सहयोगी अधिष्ठाता आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. संजय मंगला गोपाळ व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथील प्रा. डॉ. पूजा सिन्हा हे परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

या परिषदेचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, सध्याचं युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे. माहिती तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे मनुष्याचे जीवनमान पूर्णपणे बदलून गेले आहे. दैनंदिन जीवनात पदोपदी आपण विज्ञान – तंत्रज्ञानाचा अनुभव घेतोय. आधुनिक शास्त्रज्ञांनी तर मनुष्याला अज्ञात असणाऱ्या असंख्य गोष्टींवर अविरत संशोधन करून निसर्गातील अनेक अनाकलनीय पैलूंवर प्रकाश टाकला आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता मानवाला अवगत झाल्या आहेत. एकूणच मानव समाजाच्या ज्ञानकक्षा प्रचंड रुंदावल्या आहेत. या रुंदावलेल्या कक्षेत अध्यात्म नेमके कुठे बसते? विज्ञानाच्या कसोटीवर त्याचे परीक्षण आपल्याला करता येईल का ? अशा असंख्य प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी हि राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून

संशोधक व विध्यार्थ्यांना नक्कीच या परिषदेचा फायदा होणार आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर परिषदेतील प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात नमूद केले कि, ‘‘राष्ट्रनिर्मितीसाठी प्राचीन शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात् करावे. भगवद्गीतेमध्येही ही शिकवण दिली आहे. त्याच प्रमाणे मानवी जीवनाच्या उन्नत्तीसाठी अध्यात्म आणि तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणातून शिक्षण प्रदान करावे. तसेच ’’वैज्ञानिक प्रगतीमुळे बदलेल्या जीवनशैलीचे विपरीत परिणाम हळूहळू दृश्यरूप होत आहेत. जीवनात अस्थैर्य वाढीस लागले आहे. अशा समयी आपण कोणती वाट निवडायची आणि प्रगती साधायची, याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणे, हीच खरी काळाची गरज बनली आहे.विसाव्या शतकात तंत्रज्ञानानं केलेल्या बदलांचा समाजजीवनावर परिणाम झाला. अणुबॉम्बच्या निर्मितीनं तर संबंध जगाला मृत्यूच्या दाराशी नेऊन ठेवलं. पण विसाव्या शतकातले सगळेच बदल काही विनाशकारीच ठरले असं अजिबात नाही. पण त्यातल्या अणुबॉम्बनं मात्र सबंध जगाला मोठा हादरा दिला. मात्र हेही तितकंच खरं आहे की, तेव्हापासून अणुबॉम्बचा वापर जगाचा किंवा कुठल्या एका भूभागाचा विनाश करणाऱ्यासाठी झालेला नाही, होऊ शकलेला नाही. विसाव्या शतकातल्या समाजानं अध्यात्मातले, आणि तंत्रातले बदल अनुभवले. त्या बदलांची गती आजच्या अध्यात्म-तंत्रज्ञानाच्या बदलांइतकी प्रचंड नव्हती. त्यामुळे तो समाज काही या बदलांनी भोवंडून गेला नाही. आपलं तसं नाही. आज आपण ज्या एकविसाव्या शतकात जगतो, वावरतो आहोत, त्यात अध्यात्म -तंत्रज्ञानानं जो काही धुमाकूळ घातला आहे, त्यातून आपल्याला आपलं जगणं सावरणं दुष्कर होत चाललं आहे. याचं कारण आहे की, एकाच वेळी अनेक तंत्रबदल आपल्यासमोर येऊन आदळत आहेत. मोबाईल फोनपासून इंटरनेट मीडियापर्यंतच्या बदलांविषयी मी काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तसेच जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते त्यामुळे तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य सांगड घालून मार्गक्रमण करा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यानंतर कार्यक्रमातील दुसऱ्या वक्ता प्रा. डॉ. पूजा सिन्हा यांनी नमूद केले कि, तंत्रज्ञान प्रयोगातून विकसीत होते आध्यात्म योगातून प्राप्त होते, तंत्रज्ञानासाठी साधने वापरली जातात तर आध्यात्मासाठी साधना वापरली जाते असे म्हणत त्यांनी तंत्रज्ञान नीति-निरपेक्ष आहे. ते ना नैतिक आहे, ना अनैतिक. तंत्रज्ञानात विनाशक व विकासक दोन्ही शक्ती आहे. म्हणून तंत्रज्ञान सेवाही करू शकेल व संसारही. याचसाठी तंत्रज्ञानाला मूल्याची व अध्यात्माची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाला चुकीचे मार्गदर्शन मिळाले तर तंत्रज्ञान नरकाचा मार्ग होऊ शकते व योग्य मार्गदर्शन मिळाले तर स्वर्गाचा मार्ग होऊ शकते. म्हणून तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड हवी. तंत्रज्ञान जीवनाला रूप व गती देते तर, अध्यात्म जीवनाला शक्ती व दिशा देते. तंत्रज्ञान पाय आहेत तर अध्यात्म डोळे. हे तंत्रज्ञानयुग आहे व म्हणून अध्यात्माची आज सर्वाधिक गरज आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या सेमिनार हॉलमध्ये परिषदेतील उपस्थित वक्त्यांनी आपल्या अतिशय उत्साहवर्धक मार्गदर्शनातून उपस्थितांना खिळवून ठेवले. जळगाव व परिसरातील संशोधक, नागरिक, प्राध्यापक ते महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या गर्दीने सभागृह खचाखच भरलेले होते. विविध राज्यांमधून जवळपास ९८ पेपरची निवड यावेळी करण्यात आली. या राष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती जाखेटे यांनी केले तर आभार अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी मानले तसेच या परिषेदेचे समन्वय प्रा.डॉ.मुकुंद पाटील, प्रा.कल्याणी नेवे व प्रा.गौरव धाडसे यांनी साधले तसेच प्रा.डॉ.रफिक शेख, प्रा.रूपाली ढाके, प्रा.रमाकांत पाटील,प्रा.करिष्मा चौधरी, प्रा.कविता इंगळे, प्रा.मनीषा राजपूत, प्रा.मानसी तळले, प्रा.प्रतीक्षा पाटील, प्रा.प्रीतम पाटील, प्रा.हर्षिता तलरेजा, प्रा.विनीत महाजन यांनी सहकार्य केले तर सदर परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयाने शांती नांदेल : परिषदेतील सूर

तंत्रज्ञान मानवाला भौतिक सुखाची प्राप्ती करून देते, तर अध्यात्म आत्म्याची शुद्धी करण्याचे माध्यम आहे. तंत्रज्ञानाच्या अहंकारामुळे चुकीचा वापर होऊ शकतो, म्हणून अहंकार दूर करण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. विज्ञानाने तयार केलेली शस्त्रे विवेकशून्य असतात, त्यांचा योग्य वापर करण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. "काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि आळस मानवाचे सहा शत्रू आहेत जे त्याला हिंसक बनवू शकतात आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करू शकतात या शत्रूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी अध्यात्माची जोड तंत्रज्ञानासाठी आवश्यक आहे जेणेकरून जगात शांतता निर्माण होईल तसेच अध्यात्म आणि तंत्रज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघांची सांगड घातल्यास मानवी जीवन सुखी होईल असा सूर या परिषदेतुन निघाला.


Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश