जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

महाविध्यालयात संविधान उद्देशिकेचे भव्य सामुहिक वाचन  ; विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती

जळगाव, ता. २६ :  येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान दिनमोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर एस. एस. मणियार लॉ कॉलेज येथील प्रा. अंजली बोंदर या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून तर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अमोल जोशी हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले कि, संविधानाप्रती आपले प्रेम व बांधिलकी व्यक्त करण्याचा तसेच संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जागविण्याचा हा दिवस आहे. भारतीय संविधान हा आपल्याला आपल्या पूर्वजांकडून लाभलेला सर्वात मौल्यवान दागिना असून संविधानाच्या मातृरूपी छायेखाली सर्व भारतीयांचे जीवन सुकर झाले आहे.  प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाप्रती आदर आणि निष्ठा ठेऊन वागले पाहिजे. घटनेतील तत्वाप्रमाणे वागलो तर निश्चितच देशाचा व्यवहार चोख होईल. राज्यघटना ही एक जिवंत दस्ताऐवज असल्याचे मत त्यांनी व्यक्त करत स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या त्रिसूत्रीवर आधारलेला व काळाबरोबर बदलण्याची क्षमता असलेला सर्वश्रेष्ठ कायदा म्हणजे संविधान हे सांगतानाच त्यांनी संविधानाच्या निर्मितीप्रक्रियेचा आढावा घेतला. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका प्रा. अंजली बोंदर यांनी सांगितले कि, २६ नोव्हेंबर संविधान दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे. कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही. भारतातील विविध धर्म आणि जातींच्या १४० कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. राज्यघटनेतच देशाची तत्त्वे आणि ती चालवण्याच्या पद्धती आहेत. संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत.राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत असले. तर, त्यात दिलेली मुलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. यामध्ये देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये, सरकारची भूमिका, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार यांचे वर्णन केले आहे. विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचे काम काय आहे, देश चालवताना त्यांची भूमिका काय असावी, अशा या सर्व गोष्टी राज्यघटनेत नमूद केल्या आहेत.तसेच यावेळी त्यांनी संविधानाने दिलेल्या सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक स्वातंत्र्यासोबतच समानता, अभिव्यक्ती, मानवाधिकार आदी मुलभूत अधिकारांबाबत रोचक उदाहरणाद्वारे माहिती दिली. या कार्यक्रमात संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, प्राध्यापकांकडून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले व संविधानातील उद्देशांचे पालन करतील व कायद्याची बांधिलकी मानतील अशी शपथ विध्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश