छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून आचरण करणे काळाची गरज : श्री. शंभू पाटील
रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात मिरवणुकीने व रंगकर्मी शंभू पाटील यांच्या व्याख्यानाने “शिवजयंती” साजरी
जळगाव, ता. २९ : सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या थोर शिवाजी महाराजांचे विचार आचार हे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी वंदनीय असून त्यांनी कधीही भेदभाव केलेला नाही.त्यांच्या विचारांचा अंगिकार करून प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जेष्ठ रंगकर्मी व शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. शंभू पाटील यांनी केले. जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात ता. १३ बुधवार रोजी शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महोत्सवात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा हे उपस्थित होते. प्रा. डॉ अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेत नमूद केले की, शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होते, या पराक्रमाबरोबरच शिवाजी महाराज यांच्या काळात उद्योग, जलसंधारण, जलसंवर्धन, पर्यावरण, शब्दकोष आणि शिवकालीन तलाव यांची विशेष व्यवस्था होती. पाणी अडवा पाणी जिरवा हा उपक्रम शिवाजी महाराजांनी आपल्या काळात राबविला. त्याचबरोबर दुष्काळ निवारण्याची यंत्रणाही त्यांच्या काळात महाराजांनी राबविली असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले तसेच आपल्या मनोगतात श्री. शंभू पाटील यांनी नमूद केले कि, शौर्याबरोबरच शिवाजी महाराज हे कुशल प्रशासकही (मॅनेजमेंट गुरु) होते, तसेच शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी शेकडो वर्षांपासून भारतात राजेराजवाडय़ांची जुलमी राजवट होती. मोगलकर्त्यांनी जनतेवर अत्याचार, लूट केली. या प्रस्थापित राज्य व्यवस्थेविरोधात संघर्ष करण्याचे सामर्थ्यही तत्कालीन प्रजेत नव्हते. जुलमी राजवटीविरोधात लढण्याऐवजी निपचित पडलेल्या प्रजेच्या मनात स्वराज्याचा अंगार शिवरायांनी चेतविला. यापूर्वी कोणत्याही जुलमी राजाविरोधात साधा दगड भिरकावण्याची हिंमतही कोणी दाखवली नाही. अशा पीडित जनतेला शिवरायांनी जागृत केले. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी शिवरायांनी घेतली. शत्रूकडील स्त्रीयाचाही सन्मान केला. जाती-पातीत वाटल्या गेलेल्या लोकांमधून केवळ गुणवत्तेच्या आधारावर मावळे, सेवेत अधिकारी नेमले. महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून पोवाडा लिहिला. कारण ते कुळवाडीभूषण होते. आजच्या राज्यकर्त्यांनी किमान शेतकरी आणि स्त्रियांचा सन्मान, गौरव करण्याचे देखील काम केले. छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो. महाराष्ट्रातच नाही, भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पाटील व शीतल तायडे या विध्यार्थ्यानी केले. आभार जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांनी मानले तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. वसीम पटेल हे होते तर प्रा. अविनाश पांचाल, प्रा. जितेंद्र वढदकर, प्रा. डॉ. तुषार पाटील, प्रा. हिरालाल सोळुंखे, प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया , प्रा. रफिक शेख, प्रा. शंतनू पवार, प्रा. सौरभ नाईक, प्रकाश शर्मा यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले. तर सदर उत्सवाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment